देशातील जनतेची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेला खासगीकरणाचा बुस्टर देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. खासगी ट्रेनसाठी पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत निविदा काढण्यात येतील. यानुसार २०२३पर्यंत खासगी ट्रेन रुळावर धावतील, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितले. यामुळे रेल्वेच्या अत्याधुनिकरणाला वेग येणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील जनतेची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेला खासगीकरणाचा बुस्टर देण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. खासगी ट्रेनसाठी पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत निविदा काढण्यात येतील. यानुसार २०२३पर्यंत खासगी ट्रेन रुळावर धावतील, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितले. यामुळे रेल्वेच्या अत्याधुनिकरणाला वेग येणार आहे.
सरकार रेल्वेचे आधुनिकीकरण तर करू इच्छिते, परंतु त्यासाठी खर्च करण्यासाठी सरकारजवळ निधी नाही. कॉंग्रेसच्या कार्यकाळात रेल्वेचा वापर राजकारणासाठी केला गेला.
लालूप्रसाद यादव यांच्यासारख्यांना रेल्वे मंत्री करण्यात आले. सुरूवातीच्या काळात मॅनेजमेंट गुरू म्हणत रेल्वेला २० हजार कोटी रुपयांच्या फायद्यात आणल्याचा डंका त्यांनी बजावला. परंतु, प्रत्यक्षात लालूंच्या काळात रेल्वे कर्जाच्या खाईत रुतली. मोठ्या प्रमाणावर कामगार भरती करण्यात आली. यामुळे रेल्वेचा व्यवस्थापन खर्च वाढला. उत्पन्नातील मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होऊ लागला. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून मोदी सरकारला रेल्वेच्या आधुनिकीकरणाला वेग देता आला नाही. आता सरकारने काही मार्गांवर खासगी भागिदारी घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे रेल्वेला तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
इच्छा असूनही रेल्वेला आजपर्यंत कोच वाढविता आले नाहीत. देशातील ४०० रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनविण्याची तयारी आहे. खासगी भागिदारीमुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून हे शक्य होणार आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मात्र या खासगीकरणाचा कोणताही धोका नाही. कारण खासगी रेल्वेसाठीही रेल्वे कोच भारतातच तयार होतील. या खासगी ट्रेन्सचे चालक आणि गार्ड्सही रेल्वेच पुरवेल. पॅसेंजर ट्रेन्समधील खासगी भागिदारी ही रेल्वेच्या एकूण वाहतुकीच्या फक्त ५ टक्के इतकी असेल. यानुसार २०२३ पर्यंत खासगी ट्रेन धावतील. सर्व डबे मेक इन इंडिया अंतर्गत खरेदी केले जातील, अशी माहिती यादव यांनी दिली.
भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे मार्गावर खासगी ट्रेन चालवण्या करता खासगी गुंतवणुकीसाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. गेल्या वर्षी आयआरसीटीसीने लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेसपासून या योजनेची सुरुवात केलीय. सध्या आयआरसीटीसीकडून तीन खासगी ट्रेन चालवण्यात येत आहेत. वाराणसी-इंदूर मार्गावर काशी-महाकाल एक्स्प्रेस, लखनऊ-दिल्ली तेजस आणि अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेस या ट्रेन्सचा यात समावेश आहे.