…रायगडमधील बलात्कार-हत्या प्रकरणी मराठा संघटना आक्रमक

  • आरोपीस तातडीने अटक करण्याची मागणी
  • अन्यथा मंत्रालयाला घेराव घालणार

विशेष प्रतिनिधी

पुणे : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या तांबडी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना २६ जुलै रोजी घडली. या घटनेला दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही अद्याप मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. त्यामुळे राज्यातील मराठा संघटनानी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोपर्डी (नगर) पाठोपाठ तांबडीतील घटनेबाबतही सरकार आणि पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. जलदगतीने तपास करून या घटनेतील मुख्य आरोपीस तातडीने अटक करावे, अन्यथा मंत्रालयास घेराव घालणार आहोत, असा इशारा मराठा संघटनानी पत्रकार परिषदेत दिला.

अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चाचा वतीने १८ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रालयास घेराव घालणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संभाजीराजे दहातोंडे पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, परशुराम कासोळे आदी उपस्थित होते. तेलंगणा सरकारप्रमाणे या घटनेतील आरोपींनाही थेट एन्काउंटर करून मारावे, असेही दहातोंडे म्हणाले.

संभाजीराजे दहातोंडे म्हणाले, “कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी होण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ अशा घटना घडताहेत. तांबडी येथील नववीत शिकणाऱ्या मुलीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना संतापजनक आहे. ही मुलगी उत्तम खेळाडू होती. तसेच ती विद्यमान सरपंचांची मुलगी होती. मात्र, गेल्या १५ दिवसांत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांनी नेमकी काय कारवाई केली किंवा त्या कुटुंबाला भेटून सांत्वन केले का, असा आमचा सवाल आहे. अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या तपासाला जसे प्राधान्य दिले जात आहे, तसेच प्राधान्य महाराष्ट्राच्या या कन्येला न्याय मिळवून देण्यासाठी द्यावे.”

या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी मराठा संघटनांच्या समन्वयकानी तांबडी येथे पीडितेच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. तसेच तपासकार्याचा आढावा घेतला. अशा घटनांमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळेच त्याची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून न्यायालयात चार्जशीट दाखल करावे. या प्रकरणी सरकारने ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करून जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा. कोपर्डी आणि तांबडी या दोन्ही घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळवून द्यावा. अन्यथा मंत्रालयाला घेराव घालणार आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*