अयोध्येतील रामजन्मभूमीची जागा मंदिर निर्माणासाठी देण्याचा निकाल सर्वकष मुद्यांवर ठोस पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर देण्यात आल्याचे या खटल्याचा निकाल देणारे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमीची जागा मंदिर निर्माणासाठी देण्याचा निकाल सर्वकष मुद्यांवर ठोस पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर देण्यात आल्याचे या खटल्याचा निकाल देणारे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी सांगितले.
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निकाल दिला होता. गोगोई यांनी प्रथमच या निकालावर भाष्य केले आहे. माला दीक्षित लिखित ‘अयोध्या से अदालत तक भगवान श्रीराम’ पुस्तकाचे प्रकाशन करताना व्हिडीओच्या माध्यमातून अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मनोगत व्यक्त केले.
गोगोई म्हणाले की, ४० दिवस ज्येष्ठ आणि वरिष्ठ वकिलांच्या पीठानं या खटल्याला मोठं सहकार्य केलं आणि हा खटला अभूतपूर्व असाच होता. सर्वकष मुद्यांवर ठोस पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर हा निकाल देण्यात आला. अंतिम निकाला देण्याचं काम अनेक कारणांमुळे आव्हानात्मक होते. या खटल्यात प्रत्येक मुद्यांवर टोकाचा युक्तीवाद झाला आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी पूर्ण ताकदीने व इच्छाशक्तीने आपले मुद्दे मांडले होते. देशाच्या न्यायालयीन इतिहासात पूर्ण ताकदीनं लढल्या गेलेल्या खटल्यापैकी हा एक महत्त्वाचा खटला होता.
या खटल्याचं नेहमीच एक वेगळे स्थान राहणार आहे. मौखिक व वेगवेगळ्या भाषांमध्ये या असलेल्या दस्ताऐवज व साक्षीदारांच्या आधारावर या बहुआयामी खटल्यावर अंतिम निकाल देण्यात आला.
देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता. त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या या वादावर पडदा पडला. निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीलाही सुरूवात झाली आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणावर निकाल दिला होता.
तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला होता.