राज्यात ४२% वाढविताना मुंबईत केवळ १४% टक्के चाचण्या

  • मुंबईत कोरोनाच्या चाचण्या वाढवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४% अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२% आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या ६५७४ होती, ती ७७०९ वर गेली. ही वाढ केवळ १४% आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत ३७५२८ इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४८०१ एवढी झाली. ही वाढ ४२% आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात १८.४४% होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक आहे.

देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे आहे. भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (१५८४), आंध्र (१३९१), दिल्ली (९५०), तामिळनाडू (847), आसाम (748), कर्नाटक (740), बिहार (650), तेलंगाणा (637), उत्तराखंड (590), हरयाणा (563) इतकी आहे. भारताची सरासरी 545 इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांत सुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (4.18%), उत्तरप्रदेश (4.56%), पंजाब (4.69%), मध्यप्रदेश (4.74%), गुजरात (5.01%), बिहार (5.44%), हरयाणा (5.51%), ओरिसा (5.71%), झारखंड (6.19%), गोवा (8.05 %), तामिळनाडू (8.10 %), भारताचा 8.57 % तर महाराष्ट्राचा संसर्ग दर 19.15% इतका आहे.

अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्‍यात खाटांची क्षमता अधिक वाढविणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून देणे, अशा सूचनांचा यात समावेश आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*