राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुध्द शिवसेना

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विस्तारवादी भूमिकेमुळे राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुध्द शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात केवळ नावापुरेतच सत्तेवर असून प्रत्यक्षात आपल्या हातात काहीही आलेले नाही, अशी भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांची स्वतः मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा पूर्ण झाली असली तरी राष्ट्रवादीच्या विस्तारवादी भूमिकेमुळे शिवसेनेच्या अस्तित्वालाच मोठा सुरुंग लागत असल्याचे सामान्य शिवसैनिकांचे मत झाले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विस्तारवादी भूमिकेमुळे राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुध्द शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात केवळ नावापुरेतच सत्तेवर असून प्रत्यक्षात आपल्या हातात काहीही आलेले नाही, अशी भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे.

परभणीमध्ये याच संतापातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाला आग लावली. येथील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजनीमाही दिला होता. त्यांची समजूत काढण्यात यश मिळाले असले तरी इतर जिल्ह्यांतही संताप वाढू लागला आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीवरून रायगडमध्ये या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेत नव्हत्या, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. मदत वाटपात पक्षीय राजकारण झाल्याची टीका झाली होत असून त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीनंतरही शिवसेना व राष्ट्रवादीत अजूनही सख्य झालेले नाही.

परभणीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी परस्परांचे स्पर्धक असल्याने एकमेंकाविरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेनेला धक्का दिल्याशिवाय राष्ट्रवादी वाढणार नाही हे पालक मंत्री नबाब मलिक यांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला बाजुला ठेवण्याची भूमिका घेतली.

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी मुळात ही युती नैसर्गिक नाही. राज्याच्या ग्रामीण भागात शिवसेना आणि राष्ट्रवादी परस्परांचे राजकीय विरोधक आहेत.

कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीतच लढत होते. त्यांची मतपेढीही एकच आहे. त्यामुळे दोघांना एकमेंकांच्या मतांमध्ये सुरूंग लावल्याशिवाय पर्याय नाही. राज्याच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वजनदार खाती असल्याने त्याचा वापर करून पक्ष वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेत मात्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपद मिळाले यातच आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्याचे मानत आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे त्यांचे लक्षच नाही. मुंबई, ठाण्यात सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादी आपले हातपाय पसरू लागली आहे. त्यामुळे संघर्ष सुरू झाला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*