रस्ते डांबरीकरण करणाऱ्या कंपनीला घ्यावी लागणार १० वर्षांची हमी, नितीन गडकरी यांची घोषणा

रस्त्याचे डांबरीकरण हे आजपर्यंत खाऊगिरीचे कुरण बनले आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केला जातो. मात्र, आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डांबरीकरण करणार्या कंपनीने देखभाल दुरुस्तीसह १० वर्षांची हमी घेतली तरच त्यांना काम मिळणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : रस्त्याचे डांबरीकरण हे आजपर्यंत खाऊगिरीचे कुरण बनले आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केला जातो. मात्र, आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डांबरीकरण करणार्या कंपनीने देखभाल दुरुस्तीसह १० वर्षांची हमी घेतली तरच त्यांना काम मिळणार आहे.

फिकीतर्फे बिटूकॉन २०२० या कार्यक्रमात विविध कंत्राटदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना गडकरी म्हणाले, रस्त्यांचे बांधकाम करताना दर्जा उत्तम ठेवून बांधकामाचा खर्च कमी करा. डांबरीकरणाचे रस्ते ५ वर्षात खराब होतात. पाऊस जास्त असलेल्या भागात डांबरीकरणाचे रस्ते अधिक लवकर खराब होतात. डांबरी रस्ते बांधताना १० वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची हमी घेतली तरच भविष्यात डांबरीकरण परवडेल.

त्यामुळे आता देखभाल दुरुस्तीसह १० वर्षांची हमी घेणार्या कंपनीलाच डांबरीकरणाच्या रस्त्यांचे काम मिळेल. रस्ते बांधकामाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असे सांगून गडकरी म्हणाले, बांधकामाचा खर्च कमी करताना बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड आम्ही केलेली नाही.

डांबरी रस्ते बांधकाम करणार्या कंत्राटदार कंपन्यांनीही बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड न करता खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक वाटल्यास जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करावा पण बांधकामाच्या खर्चात बचत करावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*