योगींवर निशाणा साधताना इंदिराजींच्या नातीचे इतर पक्षांवर बाण…!!

प्रियांका म्हणाल्या, “जी कारवाई करायची आहे ती करा, मी इंदिरा गांधीची नात आहे. मी सत्य बोलतच राहीन, थांबणार नाही. इतर पक्षांसारखी भाजपची अघोषित प्रवक्ता नाही.”


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले असतानाच प्रियांका आज इतर पक्षांवर घसरल्या. योगींवर निशाणा साधताना त्यांनी इतर पक्षांवर वाग्बाण मारले. त्यांची “कही पे निगाहे, कही पे निशाना” अशी अवस्था झाली.

प्रियांका म्हणाल्या, “माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन. गेल्या काही महिन्यांमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत आहे. काही भाजपा नेत्यांनी माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा.”

जनतेची सेवक या नात्याने माझी लोकांशी बांधिलकी आहे. मी सरकारची स्तुती करायला बसलेले नाही. सरकारकडून मला धमकी मिळत आहे, पण यामध्ये सरकारने वेळ वाया घालवू नये. मी सत्य बोलतच राहीन. मी इतर विरोधी पक्षांप्रमाणे भाजपाची अघोषित प्रवक्ता नाहीये, अशा शब्दांत ट्विटरवरुन प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला आव्हान दिले.

काही दिवसांपूर्वी इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी आणण्यासाठी प्रियांका गांधी यांनी बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली होती. ।मात्र या बसगाड्यांना परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि प्रियांका गांधी यांच्यात बराच काळ संघर्ष चालला होता. त्यामुळे प्रियांका गांधींनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेवर भाजपा नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*