- मे महिन्यापासून कोविड निधी देणग्यांना आहोटी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कोविड-१९ मदत खात्यातील देणग्या आणि देणगीदारांची संख्या रोडावत चालली आहे. एप्रिल महिन्यात विक्रमी निधी संकलित झालेल्या या खात्यात ऑगस्ट महिन्यात फक्त १३२ देणगीदारांनी देणग्या दिल्या. एप्रिलमध्ये १५७ कोटींवर पोहोचलेली ही मदत ऑगस्टमध्ये ५ कोटींपर्यंत घसरली आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच वैद्यकीय साहाय्याच्या उद्देशाने गरिबांना थेट मदत देता यावी या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता न्यासाची स्थापना करण्यात आली. राज्यातील उद्योग संस्था, सामाजिक संस्था, वैयक्तिक दानशूर यांच्या खासगी देणग्यांमधून उभारण्यात आलेल्या या निधीतून थेट मदत करण्याचे अधिकार अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांना आहेत.
याआधी मुख्यमंत्री जलयुक्त शिवार निधी, मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी या विशेष फंडांसह “कोविड १९’ हे स्वतंत्र खाते तयार करून या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार एप्रिल महिन्यात तब्बल २८ हजार २१७ देणगीदारांनी १५७ कोटी रुपयांच्या देणग्या या खात्यात जमा केल्या. मात्र, मे महिन्यापासून या कोविड निधीसाठीच्या देणग्यांना आटत चालला आहे.
देशाच्या आणि राज्याच्या बिकट आर्थिक स्थितीवर हा देणग्यांचा आटता ओघ प्रकाश टाकतो आहे.