मुंबई- गोवा महामार्गावरील खड्ड्यासोबत सेल्फी का काढला नाही?; शेलारांचा राष्ट्रवादीला खोचक प्रश्न

  • ठाकरे – पवार सरकार कोकणी चाकरमान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहातेय

वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई – गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही?, असा खोचक सवाल भाजप आमदार आशिश शेलारांनी आज केला. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा संतत्प सवालही शेलार यांनी केला आहे.

मुंबई- गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून कोकणातून परतीच्या प्रवासात असणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. भाजपा सरकारच्या काळात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कालबद्द कार्यक्रम हाती घेण्यात आला असतानाही त्यावेळी राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा असे आंदोलनाचे राजकारण केले होते. यावेळी मुंबई सह महाराष्ट्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले तर नाहीच, कोकणात तर अख्खा रस्ता उखडून गेला मग राष्ट्रवादी सेल्फीचा तो “स्तुत्य उपक्रम” का राबवत नाही? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज का सरकारला ऐकू येत नाही? असे सवाल करीत शेलार यांनी रस्त्यावरील खड्ड्यांकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे पत्र लिहून लक्षही वेधले आहे.

या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, ठाकरे – पवार सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली. वेळीच ई पास उपलब्ध करून दिले नाहीत, एसटी उपलब्ध करुन दिली नाही, रेल्वे गाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीच केली नाही. क्वारंटाईन कालावधी आणि आरोग्याच्या उपाय योजना याबाबत सरपंच व कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्याशी वेळीच चर्चा केली नाही. अशा सरकारच्या आडमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहचला त्या चाकरमान्यांचे मुंबई- गोवा महामार्गावरी खड्यांनी जीव मेटाकुटीस आणला.

मुंबई- गोवा महामार्ग पनवेल पासून चिपळूण पर्यंत पुर्णपणे उखडून गेलेला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेली नाही. सर्वत्र खड्डे, खडी अशा अवस्थेत हा महामार्ग असून रस्त्या शिल्लक राहिलेला नाही. खेड्यातील कच्च्या रस्त्यांपेक्षा वाईट व दयनीय अवस्था या महामार्गाची झालेली आहे.

दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजविण्यात येतात मात्र यावेळी कोणत्याही प्रकारे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्यांचा प्रवासात कंबरेचे आजार होतील की काय? अशी भिती वाटते आहे. कोकणच्या रस्त्याकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल, कोकणातील माणसाला मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल आम्ही निषेध करतो. असे सांगत किमान आता तरी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*