महाराजांचे नाव घेऊन उत्तराधिकारी म्हणणाऱ्यांनी देखावा करू नये

  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

जुन्नर : “राज्यातील, देशातील जे कोणी स्वत:ला शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवून घेत असताना ते घाबरत असतील, तर मी म्हणतो ते शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी नाहीत. राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊन उत्तराधिकारी म्हणवणार्यांनी देखावा करू नये,” असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लावला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी किल्ले शिवनेरीला भेट दिली. कोश्यारी यांनी पायी गड सर केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोश्यारी म्हणाले, की राज्यात आणि देशात शिवरायांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक जण मिरवत असतात. मात्र, त्यांचे विचार आत्मसात करताना घाबरतात. अशांनी स्वत:ला उत्तराधिकारी म्हणवून घेऊ नये.

“राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याला एक किल्ला दत्तक दिला पाहिजे. असे झाले तरच राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन होईल,” असे कोश्यारी म्हणाले. राज्यपालांचे वय लक्षात घेता प्रशासनाने त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था केली होती. परंतु त्यांनी कोठेही न थांबता, भर पावसात छत्री तसेच रेनकोट न घेता तरुणांना लाजवेल अशा जोशात शिवनेरी सर केला. कोरोना प्रतिबंधक काळात विशेष परवानगी म्हणून राज्यपालांच्या भेटीसाठी किल्ले शिवनेरी खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*