महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची लबाडी

  •  १ लाख २० हजार कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून खरेच मोफत उपचार झालेत?
  •  मनसेने शोधली लबाडी; टोपेंच्या राजीनाम्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : महाराष्ट्रात १ लाख २० हजार कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दावा मनसेने खोडून काढला आहे.

१ लाख 20 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले आहेत, असे विधान राजेश टोपे यांनी केले आहे. प्रत्यक्षात व्हेंटिलेटरवर असणाऱ्याच कोरोनाबाधिताला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची सुविधा मिळते. असे असताना १ लाख २० हजार कोरोनाबाधित रूग्ण व्हेंटिलेटरवर होते का?, असा रोकडा सवाल मनसेने राजेश टोपे यांना केला आहे. इतकेच नाही तर खोटे विधान केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

मूळातच महात्मा फुले जनआरोग्य योजना ही कोरोनाबाधित रूग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांपेक्षा अधिक असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रूग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत,’ असा आरोप नवी मुंबईतील मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (155388/ 18002332200) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते. मग महाराष्ट्रात १ लाख २० हजार कोरोनाच्या रूग्णांवर या योजनेतून मोफत उपचार झालेच कसे?, असा सवाल मनसेने विचारला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*