मराठा समाज आक्रमक,उध्दव ठाकरे यांना दाखवून देणार गनिमी कावा

अनेक मागण्या प्रलंबित ठेऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता थेट मातोश्रीवर गनिमी काव्याने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : अनेक मागण्या प्रलंबित ठेऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता थेट मातोश्रीवर गनिमी काव्याने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. लाखांपेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करून आणि सगळ्या त्रुटी दूर करून मराठा समाजाला आरक्षण दिले. न्यायालयातही हे आरक्षण टिकले. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारकडे मराठा समाजाना अनेक मागण्या केल्या होत्या. मात्र, त्याकडे महाविकास आघाडी सरकारने ढूंकूनही पाहिले नाही.


मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना प्राण दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना दिलेले मदतीचे आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यांच्यासह 42 मराठा तरुणांनी प्राण गमावले होते. त्यांच्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही. यासाठी हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकापासून 23 जुलैला आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत 30 जुलैला मुंबईत बैठक देखील घेण्यात आली होती.

पाच ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र पाच तारीखही उलटून गेली आहे. यामुळे आता गनिमी काव्याने मातोश्रीवर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मराठा क्रांती मोचार्चे समन्वयक रमेश केरे पाटील व आप्पासाहेब कुढेकर पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मराठा समाजाच्या अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. मात्र, वारंवार विनंत्या करूनही महाविकास आघाडीकडून त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता आंदोलनाची धार तीव्र करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*