मध्य प्रदेशची योग्य समन्वय राखला नसल्यानेच विदर्भात महापूर, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

पूर्व विदर्भात महापुराने कहर माजवला आहे. नुकसनाग्रस्तांना मदतही मिळालेली नाही. मात्र, पूरनियंत्रणासाठी मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उदभवली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : पूर्व विदर्भात महापुराने कहर माजवला आहे. नुकसनाग्रस्तांना मदतही मिळालेली नाही. मात्र, पूरनियंत्रणासाठी मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उदभवली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विदर्भाची पूर्वस्थिती दर्शविणारा एक व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सल्लाही दिला आहे. पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

ते म्हणाले, मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उद्भवली आहे. राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर ते 36 तासांनी पोहोचते. वेळीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आले असते. पण, तसे न केल्याने नदीकिनारी राहणाऱ्या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात सुमारे 5 हजार कुटुंब बाधित असून, चंद्रपुरात 13 गावे बाधित आहेत. गोंदियात 40 गावे बाधित आहेत. गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

आता तरी मदतीसंदर्भात राज्य सरकारने त्वरित पुढाकार घेतला पाहिजे. एनडीआरएफची मदत वेळीच घेता आली असती, पण त्यालाही विलंब लागला. आता राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून वेळीच मदत करावी. मदतीसंदर्भात कोल्हापूरच्या पुराच्या धर्तीवर स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी राज्य सरकारकडे मागणी आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*