‘बॅगा’ मिळत नसल्याने कॉंग्रेसला मिळेना सरचिटणीस

राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी असलेले कॉँग्रेसचे सरचिटणिसपद एकेकाळी पक्षात अत्यंत महत्वाचे मानले जायचे. या प्रभारींना दिल्या जाणाऱ्या बॅगांची चर्चाही व्हायची. परंतु, आता बॅगा मिळण्यासारखी परिस्थिीतीच राहिली नसल्याने कॉँग्रेसला सरचिटणिसासाठी शोध घेण्याची वेळ आली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी असलेले कॉँग्रेसचे सरचिटणिसपद एकेकाळी पक्षात अत्यंत महत्वाचे मानले जायचे. या प्रभारींना दिल्या जाणाऱ्या बॅगांची चर्चाही व्हायची. परंतु, आता बॅगा मिळण्यासारखी परिस्थिीतीच राहिली नसल्याने कॉँग्रेसला सरचिटणिसासाठी शोध घेण्याची वेळ आली आहे.

कॉँग्रेसच्या कार्यकाळात राज्यांचे प्रभारी सरचिटणिस या पदाची बदनामी झाली. पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील कार्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणून हे पद होते. मात्र, त्यापेक्षा या पदावरील व्यक्ती राजकीय तोडी करण्यातच धन्यता मानत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकांमध्ये प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांपेक्षा या प्रभारींची दादागिरी चालयाची. मार्गारेट अल्वा यांच्यासारख्या प्रभारींनी तर तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही सळो की पळो करून सोडले होते.

कॉँग्रेसमध्ये ही परिस्थिती असताना भारतीय जनता पक्षातील सरचिटणिस पदावरील व्यक्तींनी कामाचा आदर्श घालून दिला. एखाद्या राज्याची जबाबदारी मिळाल्यावर पूर्णपणे त्यावर लक्ष केंद्रीत करायचे, सत्ता असो किंवा नसो सातत्याने कार्यरत राहायचे, असे दाखवून दिले. पश्चिम बंगालमध्ये कैलास विजयवर्गीय, बिहारमध्ये भुपेंद्र यादव, उत्तर प्रदेशात जे. पी. नड्डा यांच्यासारख्या नेत्यांनी कामाचा आदर्श निर्माण केला. त्यामुळे कॉँग्रेसमधील कार्यकर्तेही आता सरचिटणिसाकडून अपेक्षा व्यक्त करत आहेत. परंतु, प्रत्यक्ष जमीनीवर जाऊन काम करण्याची कोणाचीच तयारी नसल्याने या पदासाठी इच्छुकच राहिले नाहीत.

महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे प्रकृतीच्या कारणांमुळे फार सक्रिय राहू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष कोणा युवक नेत्याला महाराष्ट्राची जबाबदारी देऊ इच्छिते.  या बदलामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही परिवर्तन होईल. त्याअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या पूर्णकालिक पदांवर नव्या नियुक्या शक्य आहेत.

झारखंडमध्ये आर. पी. एन. सिंह यांच्याबद्दल अनेक तक्रारी  आहेत. त्यामुळे पक्षाने सिंह यांच्या जागी दुसरा अनुभवी नेता नेमण्याचे ठरवले आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्या प्रकारे पक्षात फूट पडली त्यामुळे नेतृत्व मोठे नाराज आहे. तेथेही पक्ष कोणत्या ज्येष्ठ नेत्याला प्रभारी सरचिटणीस बनवून पाठवण्याच्या तयारीत आहे.