पार्थ प्रकरणानंतर अजित पवार पडले एकटे, निकटवर्तीयांनीही सोडली साथ

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ‘पार्थ प्रकरणा’नंतर फुट पडण्याची चिन्हे निर्माण झाली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र एकटे पडले आहेत. राज्यातील सत्ता शरद पवार यांच्या हातात असल्याने पवार यांच्या अगदी निकटवर्तीयांनीही त्यांची साथ सोडली आहे. बंधु श्रीनिवास पवार यांच्यासोबत चर्चा करून अजित पवार आपली पुढची रणनिती आखण्यासाठी बारामतीत पोहोचत आहेत.


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पार्थ प्रकरणानंतर फुट पडण्याची चिन्हे निर्माण झाली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र एकटे पडले आहेत. राज्यातील सत्ता शरद पवार यांच्या हातात असल्याने पवार यांच्या अगदी निकटवर्तीयांनीही त्यांची साथ सोडली आहे. बंधु श्रीनिवास पवार यांच्यासोबत चर्चा करून अजित पवार आपली पुढची रणनिती आखण्यासाठी बारामतीत येत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने राज्यातील महाविकास आघाडीला चांगलाच दणका दिला आहे. एका बाजुला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात येत आहे. दुसर्या बाजुला या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे पार्थ पवार यांना शरद पवार यांनी खडसावले आहे. पार्थ इमॅच्यूअर आहे, त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असे म्हणून शरद पवार यांनी केवळ पार्थलाच नव्हे तर अजित पवार यांनाच त्यांची जागा दाखवून दिली.

अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने दबाव निर्माण करण्यासाठी जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज्यातील सत्ता शरद पवारच चालवित असल्याने कोणीही त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही. बहुतांश नेते शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहेत.

राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, छगन भुजबळ असे नेते शरद पवारांच्या स्पष्टपणे बाजूने आहेत.

जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पार्थ यांच्या विषयी आणि ते करत असलेल्या कृत्याविषयी काही गोष्टी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याशिवाय काही नेत्यांनी व अधिकार्यांनी पार्थ पवार हे बाहेर तुमच्याबद्दलबकाय बोलतात, हे पवार यांच्या कानावर घातले होते. मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर काही नेत्यांनी पार्थला मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहा, असा सल्ला दिला होता. मात्र पार्थ तिकडे फिरकलेच नाही. अजित पवार यांचे सोशल मीडिया पार्थच हाताळत होता. पक्षातल्या काही नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणे असे प्रकारही पार्थच्या सांगण्यावरून घडले. शरद पवार यांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थने शरद पवार यांची भेट घेतली. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, आपल्याला तीच भूमिका घ्यावी लागेल, माझ्या कुटुंबातील व्यक्तीनेच त्याला छेद देणारी भूमिका घेणे पक्ष हिताचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी त्याला पुन्हा फटकारले.

मात्र, शरद पवार यांचे म्हणणे पार्थला पटले नाही. अजित पवारही यामुळे नाराजच आहेत. त्यांनी काही गडबड करू नये म्हणून शरद पवारांनी आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रीय केले आहे. प्रामुख्याने खासदर सुप्रिया सुळे यांनी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.

या परिस्थितीत आपल्या निष्ठा शरद पवार यांच्याशीच असल्याचे दाखवून देण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक नेत्यांची रीघ लागली होती. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादीला विश्वास वाटत नाही. सगळ्याच पहिल्यांदा तेच पवारांच्या भेटीला पोहोचले. खासदार सुनील तटकरे यांनीही उपस्थिती लावून आपल्या निष्ठा शरद पवारांच्या पायाशी असल्याचे दाखवून दिले. गृहमंत्री अनिल देशमुख, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राज्यमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुप्रिया सुळे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र, सगळ्यांनीच बैठक वेगळ्या कारणांसाठी असून पार्थ पवार प्रकरणाशी त्याचा काही संबंध नसल्याचे सांगितले.

या सगळ्या घडमोडींनंतर आता अजित पवार कुटुंबातील ‘कोअर कमीटी’ शनिवारी बारामतीत भेटत आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांची भूमिका महत्वाची आहे. राष्ट्रवादीमध्ये यापूर्वी जेव्हा अजित पवार यांनी फुट घडविण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा श्रीनिवास पवार पूर्ण वेळ त्यांच्यासोबत होते. त्यामुळे श्रीनिवास पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह चर्चा करून अजित पवार पुढील निर्णय घेतील, असे म्हटले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*