पार्थला आत्या विजया पाटील यांचे समर्थन, ‘पवारसाहेबांना आणखी कोणाला संदेश द्यायचा होता,’ असा केला सवाल

“शरद पवार यांना मी खूप लहानपणापासून आणि जवळून ओळखते. मात्र इतक्या कठोर शब्दांमध्ये त्यांनी कोणालाच बोललेले मला तर आठवत नाही. पवारसाहेबांचे हे बोलणं फक्त पार्थ यांनाच उद्देशून होतं का? की आणखी कोणाला संदेश द्यायचा होता,” असा सवाल अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : “शरद पवार यांना मी खूप लहानपणापासून आणि जवळून ओळखते. मात्र इतक्या कठोर शब्दांमध्ये त्यांनी कोणालाच बोललेलं मला तर आठवत नाही. पवारसाहेबांचे हे बोलणं फक्त पार्थ यांनाच होतं का? की आणखी कोणाला संदेश द्यायचा होता,” असा सवाल अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना विजया पाटील यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, “पार्थ पवार हे वैयक्तिकरित्या आपली भूमिका मांडू शकतात. सुप्रिया सुळे यांनी हा विषय माध्यमांसमोर मांडला होता की, पार्थ याची ही वैयक्तिक भूमिका होती. पार्थ पवार यांनी मांडलेली भूमिका ही ‘राष्ट्रवादी’च्या भूमिकेशी विसंगत असेल, अस पार्थ यांना वाटलं नसेल, मात्र वैयक्तिकरित्या तो भूमिका मांडू शकतो.”

कदाचित शरद पवार यांना गाडीत बसत असतानाच हा प्रश्न विचारला गेला. त्यामुळे ते भंडावून गेले असतील. त्यामुळेच त्यांनी असे उत्तर दिले असेल अशी शंकाही विजया पाटील यांनी व्यक्त केली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केल्यामुळे पार्थ पवार यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांना भेटून केली होती. यावरून शरद पवार यांनी पार्थला चांगलेच खडसावले होते. पार्थ इमॅच्यूअर आहे, त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असे ते म्हणाले होते.

म्हणून शरद पवार यांनी केवळ पार्थलाच नव्हे तर अजित पवार यांनाच त्यांची जागा दाखवून दिली, असे बोलले जात होते. आता अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनीही पार्थला बोलले हा कोणाला संदेश होता असा प्रश्न उपस्थित केल्याने पवार कुटुंबियात या प्रकरणामुळे आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*