पडळकरांचे शब्द चुकले… पण पवारांबद्दलच्या अनुभवातूनच ते बोलले…!!

  • माझ्याबद्दल कोणीही काही बोलतात, फडणवीस यांना टोपण नावे ठेवतात? ते चालते का? चंद्रकांत पाटलांचा परखड सवाल

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर/ रत्नागिरी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना कोरोना म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात रान पेटवल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे हे पडळकरांमागे उभे राहिले आहेत.

पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या वैयक्तिक टीकेचे दोन्ही नेत्यांनी समर्थन केलेले नाही. पण पडळकरांनी केलेल्या टीकेतील अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेले चालते का? ही महाष्ट्राची संस्कृती नाही. पडळकरांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. पडळकर एक समजूतदार कार्यकर्ता आहेत. त्यांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. इतक्या जुन्या प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारण्याची तशी गरज नव्हती. पण शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिले नाही असा अनुभव त्यांना आला असेल म्हणूनच त्यांनी ते वक्तव्य केले असेल. शरद पवारांचा अनादर व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी पडळकर यांना शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे.”

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीलाही खडे बोल सुनावले. ते म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतो. आम्हाला कसलीही टोपण नावे ठेवली जातात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामे जरूर केली. परंतु तुम्ही अग्रलेखामध्ये काय लिहिता? त्यातली तुमची भाषा कसली आहे?,” असे म्हणत त्यांनी शिवसेनेवरही शरसंधान केले.

राजकारणात निश्चितपणे शब्द जपून वापरले पाहिजेत. अन्यथा त्याची जखम खूप दिवस राहते. गोपीचंद पडळकर चुकले म्हणून इतरांनी काहीही बोलू नये. कोणी काहीही बोलले तरी चालते का? असा परखड सवालही त्यांनी केला.

गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे म्हणून राष्ट्रवादीला मस्ती आली आहे, अशी टीका नीलेश राणे यांनी केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांचे निमित्त करून भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना सोडणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*