निवृत्ती महाराजांना वक्तव्य भोवले, गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मुलगा-मुलगी जन्माबाबत केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराजांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर न्यायालयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मुलगा-मुलगी जन्माबाबत केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे.  या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात संगमनेर न्यायालयात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर न्यायालयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदुरीकर महाराज यांनी एके ठिकाणी किर्तन करताना ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे वक्तव्य केलं होतं. इंदोरीकरांच्या कीर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या  युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याने पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर येथील पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांच्या मार्फत बाजू मांडली होती.

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होतं नसल्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे रंजना गावंदे यांनी जिल्हा पीसीपीएनडीटी समितीला नोटीस दिली होती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती. त्यामुळे अखेर १० जून रोजी संगमनेर येथील वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, इंदुरीकर महाराज म्हणाले, दोन तासांच्या कीर्तनात एखादे वाक्य चुकीचं जाऊ शकते. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेले अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून थेट शेती करेन.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*