नापाक देशातील दहशतवादाचे कारखाने जगाने कायमचे नष्ट करावेत, एस. जयशंकर यांची पाकिस्तानवर टीका

जगाला दहशतवादाच्या खाईत लोटलेला, असंख्य निष्पाप लोकांचे बळी घेतलेला नापाक देश आज स्वत:ला दहशतवादग्रस्त असल्याचे भासवत आहे. स्वत:चे नापाक कृत्य लपविण्यासाठी हा देश आणखी किती खोटे बोलणार आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगाला दहशतवादाच्या खाईत लोटलेला, असंख्य निष्पाप लोकांचे बळी घेतलेला नापाक देश  आज स्वत:ला दहशतवादग्रस्त असल्याचे भासवत आहे. स्वत:चे नापाक कृत्य लपविण्यासाठी हा देश आणखी किती खोटे बोलणार आहे? अशा देशांमधील दहशतवादी कारखाने कायमचे नष्ट करण्यासाठी आता जगानेच ठोस यंत्रणा स्थापन करावी, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर म्हणाले, चीनी व्हायरसच्या महामारीला आळा घालण्यासाठी संपूर्ण जग एकवटले आहे, लस तयार करीत आहे. त्याच पध्दतीने दहशतवादाला कायमचा आळा घालण्यासाठीही जगाने एकत्र येण्याची गरज आहे.

सध्या फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दहशतवादाला पोसणार्या त्यांना आर्थिक व शस्त्रांची मदत उपलब्ध करणाऱ्या काही देशांना जागतिक काळ्या यादीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. आमच्या भूमीत दहशतवादीच नाही, असे वारंवार जगाला सांगणार्या पाकिस्तानने तर अलिकडेच 88 दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंध घातले आहेत. इतकेच काय, तर दाऊद इब्राहिम आमच्या देशात नाही, असा सातत्याने दावा करणार्य या देशाने या यादीत त्याचा उल्लेख करताना, कराचीतील त्याचा पत्ताही सादर केला आहे. आपले नापाक कृत्य लपविण्यासाठी एखादा देश किती खोटे बोलू शकतो, याचे उत्तर उदाहरण म्हणजे पाकिस्तान आहे, असे जयशंकर म्हणाले.

“जगातील बहुतांश देश दहशतवादाचे शिकार ठरले असतानाही, काही देश अजूनही पाहिजे तसे गंभीर दिसत नाही. अमेरिकेवरील 9/11 चा आणि मुंबईवरील 26/11 चा हल्ला जगाचे डोळे उघडण्यासाठी पुरेसा होता, पण तसे झाल्याचे दिसत नाही. एफएटीएफने पाकिस्तानसह काही देशांविरोधात पाश आवळला असला, तरी एवढ्याने काहीच होणार नाही. दहशतवादाचे कारखाने समूळ नष्ट करून, जगाला या विळख्यातून कायमचे मुक्त करण्याची गरज आहे आणि त्यासाठी जगाने ठोस यंत्रणा स्थापन करायलाच हवी,” असे जयशंकर यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*