दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी भाजपा मुख्यमंत्र्यांना पाठविणार ५ लाख निवेदने

राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांवर राज्य सरकार मौन आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या बैठकीत करण्यात आला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना तब्बल ५ लाख निवेदने पाठवण्यात येणार आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांवर राज्य सरकार मौन आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या बैठकीत करण्यात आला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना तब्बल ५ लाख निवेदने पाठवली जाणार आहे.

राज्यात भाजपासह विविध पक्षांनी आंदोलने करूनही राज्य सरकारने दूध उत्पादकांना सरसकट अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकारने गेंड्याची कातडी पांघरून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप बैठकीत करण्यात आला.

दूध आंदोलनाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असूनही हा विषय केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. यावरून राज्य सरकार आपल्या जबाबदारीची चालढकल करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत महायुती दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगण्यात आले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे. दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे. गाईच्या दुधाला ३० रुपये दर द्यावा, अशा दूध उत्पादकांच्या मागण्या आहेत.

त्यामुळे १३ ते १९ ऑगस्टदरम्यान दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मागण्यांचे लेखी पत्र, ई-मेल, फोन कॉल किंवा इन्स्टाग्राम या विविध मार्गांनी ५ लाख निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*