- “माझा एन्काउंटर केला नाही म्हणून उत्तर प्रदेश सरकारचे आभार”
- “उत्तर प्रदेशात राजा राजधर्म न करता फक्त बाल हट्ट करत आहे”
वृत्तसंस्था
गोरखपूर : गोरखपूर येथील डॉ. काफिल खान यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत केलेला आरोप रद्द करत अलहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर खान यांची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खान यांनी लगेच कुत्सित वक्तव्ये करायला सुरवात केली. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे एन्काउंटर न केल्याबद्दल आभार मानले.
डॉ. काफिल खान यांच्यावर सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसीविषयी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली होती. द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली एनएसए कायद्यातंर्गत कारवाई करत काफिल खान यांना ताब्यात घेण्यात आले होते.
तेव्हापासून काफिल खान मथुरेतील तुरुंगात बंद होते. “अतिशय योग्य न्याय देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा मी आभारी आहे, मला मुंबईवरून मथुरेपर्यंत आणताना माझा एन्काउंटर केला नाही, यासाठी मी एसटीएफचेही आभार मानतो,” असे कुत्सित वक्तव्य काफिल खान यांनी केले.
त्यांनी शहाजोगपणे रामायणाचा दाखलाही दिला. रामायणात महर्षी वाल्मिकींनी म्हटले आहे की, राजाने राज धर्मासाठी काम केले पाहिजे, पण उत्तर प्रदेशात राजा राजधर्म न करता फक्त बाल हट्ट करत आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.
न्यायालयाच्या निकालानंतरही तुरूंग अधिकाऱ्यांकडून डॉ. काफिल खान यांना बराच वेळ सोडण्यात आले नव्हते, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.