ठाकरे – पवार सरकारच्या कालावधीत धान्य खरेदी भ्रष्टाचार; ‘एसआयटी’ नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचे आदेश

  • भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान्य खरेदीत भ्रष्टाचार

वृत्तसंस्था

मुंबई : भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस ७/१२ दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धान्यासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून, यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिले.

यासंदर्भात विधानभवनात आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

आरोपींनी आदिवासी विकास महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, देवरी येथे आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नियमबाह्य धान्य वाहतूक करून तसेच बोगस कागदपत्रे बनवून महामंडळाची फसवणूक केलेली आहे.  गोंदिया जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये सन २०१९ व २०२० मध्ये धान्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या.

गडचिरोली येथेही धान्य खरेदी पणन हंगाम सन २०१८-२०२० मध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस ७/१२दाखवून शेतकऱ्यांचे अनुदान लाटणे, मृत्यू झालेल्या वा शेत जमीन नसलेल्यांच्या नावे अनुदान घेणे, वन विभागाच्या जागेत धान्य शेती लागवड झाल्याचे दाखवून अनुदान उचलणे, इत्यादी गंभीर प्रकार या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आले आहेत. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात गैरव्यवहाराचे प्रकार झाले आहेत. शेतकऱ्यांशी संबंधीत या संवेदनशील प्रश्नी दोषींना कडक शासन झाले पाहिजे,  अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेत यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि आरोपी जेरबंद व्हावेत, यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात यावे, असे निर्देशे दिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*