ठाकरे-पवारांच्या राज्यात; शेतकरी चौफेर संकटात

  • कापूस घरात पडून, शेतमालाचा पैसा नाही, कर्जमाफी पदरात पडली नाही, बियाणेही बोगस
  • चौफेर संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करा; फडणवीसांची आग्रही मागणी

विशेष प्रतिनिधी

अमरावती : कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. अन्य शेतमालाचा पैसा त्याला मिळालेला नाही. कर्जमाफीही पदरी पडत नाही आणि बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट त्याच्यावर ओढवलंय. राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ते म्हणाले, “कोरोनाच्या संकटात या चौफेर समस्यांनी शेतकरी घेरला आहे. शेतकऱ्यांचे जगणे आणखी कठीण झाले आहे.
राज्य सरकारने वेळीच आणि गांभीर्याने याकडे लक्ष दिले पाहिजे. सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने मोठे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. चांदूरबाजार, भातकुली, अचलपूर या साऱ्याच तालुक्यांमध्ये हीच स्थिती सर्वत्र आहे. अशात स्थानिक प्रशासनाने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.”

महाबीजचे बियाणे बोगस निघावे, ही तर आणखी गंभीर आहे. इतरही कंपन्यांच्या बियाणांची तीच अवस्था आहे. बियाणे कायद्यानुसार ज्या कंपनीचे बियाणे बोगस निघाले, त्यांना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावीच लागते. शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेऊन त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून दिली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*