जात पैशात अडकलेलं राजकारण बदलायचं म्हणूनच मनसे, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

नवनिमार्णाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. कार्यकर्त्यांनी धीर सोडू नये असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : नवनिमार्णाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. कार्यकर्त्यांनी धीर सोडू नये असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

मनसेच्या नांदेड येथील पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करत आमच्या येथे पैसा आणि जात दोन्ही गोष्टींवर राजकारण होतं आहे, दोन्ही माझ्याजवळ नाही, असे म्हटले होते. यामुळे राज ठाकरे भावनिक झाले आहेत. त्यांंनी फेसबुकवर एक पत्र लिहून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र अशी सुरूवात करून राज ठाकरे म्हणतात, संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून विचलित होऊन जायचं नाही वा उतार आला म्हणून हुरळायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.

सुनील ईरावर या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की ‘साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा.’

अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुरु केला. नवनिमार्णाच्या आपल्या या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते. पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.

मी या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो असे म्हणून राज ठाकरे म्हणाले, हा या जातीचा… त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत… या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे… असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही. मला माझ्या पक्षाचे राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचे नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.

सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*