- नवीन हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला
विशेष प्रतिनिधी
सांगली : साखर कारखान्यांचा नवीन हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला तरी सांगली जिल्ह्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या तीन साखर कारखान्यांसह एकूण आठ कारखान्यांकडे ७५ कोटी रुपयेे एफआरपीची रक्कम थकीत आहे.
सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सोनहिरा साखर कारखान्यासह, क्रांती, दत्त इंडिया आणि दालमिया शुगर या चार कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. करोना संसर्गाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने कारखान्यांनी तातडीने थकीत रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या वर्षी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होताना टनाला तीन हजार रुपये मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव आणि वाढता उत्पादन खर्च पाहता एकरकमी रक्कम देता येणार नसल्याची भूमिका कारखान्याने घेतली होती. यानंतर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या चर्चेअंती एफआरपीचे तुकडे करण्यात आले होते.
साखर उद्योगासमोरील अडचणी लक्षात घेऊन शेतकरी संघटनांनीही नरमाईची भूमिका घेतली. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी २३०० ते २४०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला होता. जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांनी गेल्या वर्षाच्या गळीत हंगामात ६७ लाख २३ हजार ७७३ टन उसाचे गाळप करुन ८३ लाख १९ हजार ७५४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. तेरा कारखान्यांपैकी क्रांती, सोनहिरा, दत्त इंडिया आणि दालमिया शुगर या चार कारखान्यांनी एफआरपीनुसार एकरकमी उसाची बिले शेतकऱ्यांना दिली आहेत.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखराळे युनिटची एफआरपी २ हजार ९६६ रुपये असून, त्यापैकी प्रतिटन २ हजार ४०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे. दुसरा हप्ताही २५० रुपयांचा दिला आहे. तिसरा हप्ता ३१५ रुपयांचा कारखान्याकडे थकीत आहे. राजारामबापू पाटील वाटेगाव युनिटची २ हजार ९०६ रुपये एफआरपी असून, दोन हजार ४०० रुपयांचा पहिला आणि २५० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला. २५६ रुपयांचा तिसरा हप्ता थकीत आहे. कारंदवाडी युनिटची २ हजार ९२० रुपये एफआरपी असून, त्यापैकी पहिला हप्ता २ हजार ४०० रुपये, दुसरा हप्ता २५० रुपये दिला आहे. तिसरा हप्ता २७० रुपयांचा थकीत आहे.
शिराळ्यातील विश्वासराव नाईक या कारखान्याची २ हजार ८५२ रुपये एफआरपी आहे. त्यापैकी पहिला हप्ता २ हजार ४००, दुसरा हप्ता २५० रुपये दिला आहे. तिसरा हप्ता २०२ रुपये शेतक-यांना अजून मिळालेला नाही. मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), श्री श्री सद्गुरू (राजेवाडी, ता. आटपाडी), उदगिरी शुगर (पारे, ता. खानापूर) या कारखान्यांनी पहिला आणि दुसरा हप्ता दिला आहेे. मात्र अंतिम हप्ता थकीत आहे. या आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ७५ कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम थकीत आहे, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयाने दिली. गेल्या सहा महिन्यांपासून करोना संसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढल्याने साखर कारखान्यांनी तातडीने एफआरपीची थकीत रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हान
करोना संसर्गामुळे हॉटेल व्यवसाय बंद राहिला. साखर निर्यातीवरही गंभीर परिणाम झाल्याने अनेक कारखान्यांकडे साखर शिल्लक आहे. मागणीअभावी साखर पडून असल्याने अपेक्षित दर मिळत नाही. यातच येणाऱ्या दोन महिन्यात नवीन हंगाम सुरू होणार असल्याने साखर कारखान्यांसमोर साखर विक्रीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. योग्य वेळेत साखरेची विक्री न झाल्यास शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळणे मुश्कील होऊ शकते.