‘जनसेवेचा मानबिंदु’ ग्रंथाद्वारे खडसेंच्या अपरीचित गोष्टींचा उलगडा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वरील ‘जनसेवेचा मानबिंदु’ या प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी लिहिलेल्या ग्रंथांत खडसेंच्या अनेक अपरिचित गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवारी (ता. २) या ग्रंथाचे प्रकाशन भाजपच्या नेत्यांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खडसे यांचे नेतृत्व नेहमीच वादळी राहिले आहे. विधानसभेतील व जाहिर सभेतील भाषणातुन त्यांनी आपली आभ्यासु वृत्ती सिध्द केली आहे. नेहमीच चर्चित असलेल्या या नेतृत्वावर प्रा. डॉ. नेवे यांनी पीएचडी देखील केली आहे. शोध प्रबंधातील काही मुद्दे व अपरिचित अनेक गोष्टी मिळून नेवे यांनी २२० पानांचा हा ग्रंथ लिहिला आहे. खडसे यांचे राजकीय, सामाजिक व कौटुंबिक पैलुंचा उलगडा या ग्रंथांत होतो.

राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी.डी.देवरे यांची ग्रंथाला प्रस्तावना आहे. शिवाय विविध पक्ष नेत्यांच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या खडसे यांच्या बद्दलच्या भावना या ग्रंथात आहेत. प्रा. डॉ. नेवे म्हणतात नाथाभाऊंनवरील हा गौरव ग्रंथ नाही. यात त्यांचे तटस्थपणे व वस्तुनिष्ठ मुल्यमापन करण्यात आले आहे. ग्रंथ लिहीण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. मात्र हा ग्रंथ नव्याने नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी व युवक यांना मार्गदर्शन करणारा दिपस्तंभ ठरेल असे नेवे म्हणाले.

दरम्यान प्रकाशन सोहळा प्रत्यक्ष व ऑनलाईन असा भव्य होणार आहे. मुख्य कार्यक्रम मुक्ताईनगरला खडसे यांच्या उपस्थितीत होईल. तेथे खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, आमदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदींच्या उपस्थितीत होईल. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजी विधानसभा सभापती हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अनुक्रमे नागपुर, भोकरदन, औरंगाबाद, चंद्रपूर येथुन ऑनलाईन प्रकाशन करतील. या सगळ्यांना ग्रंथ पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा संपूर्ण सोहळा खडसे यांच्या चाहत्यांना ऑनलाईन युट्युब व फेसबुकवर पाहता येईल. त्या संदर्भातील लिंक आज(ता. ३०) शेअर केली जाणार आहे. ग्रंथ हार्ड कॉपी प्रमाणेच पीडीएफ फाईल मध्ये देखील उपलब्ध राहणार आहे. अशी माहिती नेवे यांनी दिली.

उलट्या स्वस्तिकचा उलगडा

खडसे यांच्या बालपणातील व तारुण्यातील अनेक गोष्टींचा उलगडा या ग्रंथात आहेच. शिवाय एकेकाळी गाजलेले जर्मनीचा हुकूमशाहा हिटलरच्या नाझी पक्षाचे चिन्ह असलेले उलटे स्वस्तिक हे चिन्ह खडसे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर कसे काय आहे? याचा उलगडा देखील या ग्रंथात करण्यात आला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*