चीनी अ‍ॅपवरच्या बंदीमुळे आक्रस्ताळ्या चीनची भारताला आर्थिक युद्धाची धमकी

भारतातील चीनी गुंतवणूक ५०% घटण्याचा इशारा


वृत्तसंस्था

बीजिंग : भारताने ५९ चीनी अॅपवर घातलेली बंदीची मिरची चीनला चांगलीच झोंबली असून चीनच्या माओवादी कम्युनिस्ट सरकारने भारताला आर्थिक युद्धाची धमकी दिली आहे.

पूर्व लडाखच्या गलवान हिंसक संघर्षानंतर चीनच्या कुरापतखोरीची गंभीर दखल घेत भारताने सोमवारी ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घालत झटका दिला. यावर चीन खवळला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने भारताला धमकावण्यास सुरुवात केली असून भारताविरोधात आर्थिक युद्ध पुकारण्याचा इशारा दिला आहे. याचे परिणाम अतिशय वाईट होतील, असे चीनच्या ग्लोबल टाइम्सने धमकावले आहे. चीनमधून भारतात होणारी परकीय गुंतवणूक २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५०% घटेल, असा दावा चीनी अभ्यासकांनी केला आहे.

चीनी नागरिकांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घातला तर एकही भारतीय उत्पादन चीनमध्ये विकले जाणार नाही. यामुळे भारतीयांनी राष्ट्रवादाशिवाय महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींचीही गरज लक्षात घ्यावी असा शहाजोग सल्ला ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजीन यांनी भारताने न मागता दिला आहे. याशिवाय भारताच्या अन्य नुकसानीचाही इशारा दिला आहे.

सर्वाधिक पसंतीच्या मार्केटमध्ये भारत

एक वर्षापूर्वी भारत हे चीनी गुंतवणुकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे मार्केट होते. ‘भावी वन बिलियन मार्केट’ असे संबोधले जात होते. चीनी मोबाइल इंटरनेटसाठी महत्वाचे ठरत होते. २०१७ ते २०२० मध्ये भारतात चीनमधून १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली गेली होती. पण आधी करोना व्हायरस आणि आता सीमेवरील तणावाने संबंध बिघडत गेले, अशी मखलाशी ग्लोबल टाइम्सने केली आहे.

अ‍ॅपवरील बंदीचा फटका बसेल, पण…

भारताने चीनी अ‍ॅपवर बंदी घातल्याने संबंधित कंपन्यांवर याचा परिणाम नक्की होणार आहे. पण चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकेल इतकी शक्ती भारतात नाहीए, असे ग्लोबल टाइम्सने लिहिलेय.

भारताच्या निर्णयामुळे चीनी गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे. करोना व्हायरसच्या संकटामुळे सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतील. अशा स्थितीत भारत सरकार देशातील राष्ट्रवादाला आणखी प्रोत्साहन देत असेल तर डोकलामपेक्षाही मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना भारताला करावा लागेल, असे “भाकितही” ग्लोबल टाइम्सने केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*