चीनवर अवलंबून राहणे बंद करून भारतातच उत्पादन वाढवावे : गडकरी


संपूर्ण जगाला चीनशी व्यवहार करण्यात फारसा नसणे हे भारतासाठी सुचिन्ह…!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचा उगम आणि फैलाव, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत्या कुरापती यामुळे जगभरातील देशांना चीनशी व्यवहार करण्यात रसच उरलेला नाही. हे भारतासाठी सुचिन्ह आहे. जगाचा व्यापार भारताकडे खेचता येईल. भारतीयांनी चिनी उत्पादनांवर अवलंबून न राहता भारतातच उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लडाखच्या गालवन खोऱ्यामध्ये हिंसक संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. त्यानंतरही चीनकडून कुरापती सुरूच असल्यामुळे भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला करून दिली आहे. आमच्यासाठी देशाचे ऐक्य आणि सार्वभौमत्व सर्वात महत्वाचे आहे. भारताला शांतता हवी आहे. मात्र, जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे, असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे. अशा चीनच्या या दुष्कर्मामुळे आता संपूर्ण जगाला चीनशी व्यवहार करण्यात फारसा रस नसल्याचे चित्र समोर येत आहे. ही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जमेची बाजू असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, “चीनचे भारतासह अन्य देशांसोबतचे संबंध आता चिघळले असल्यामुळे चीनशी व्यवहार करण्यात आता जगाला फारसा रस उरला नाही. त्यामुळे अनेक देश भारताशी व्यवहार करण्यास पुढे येत आहेत. अशा स्थितीत भारताने आयातीपेक्षी निर्यातीवर भर देणे आवश्यक आहे. भारताने आता चीनवर अवलंबून राहू नये, त्याऐवजी भारतामध्येच निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतातच संशोधनावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. केंद्र सरकार आयातीसंदर्भात नवे धोरण तयार करत अाहे.”

भारत आणि चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी केलेल्या सूचक वक्तव्यावरून भारत आणि चीनमधील ट्रेड वॉर भविष्यात आणखीन वाढू शकते अशी चिन्हे दिसत आहे.

कोविड १९ नंतर भारतीय इलेक्ट्रीक व्हेइकल रोडमॅप म्हणजेच विजेवर चालणाऱ्या गाड्यांचे भविष्य या विषयावरील एका वेबिनारमध्ये गडकरी सहभागी झाले होते. “हीच योग्य वेळ आहे असे वाटते. यापूर्वी मी थेटपणे बोललो नाही मात्र आता भारताने चीनवर अवलंबून राहू नये असे मला वाटते.” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

सध्या चिनी उत्पादनांच्या किंमती कमी आणि आकर्षक आहेत. याचाच फायदा घेत भारतीय इलेक्ट्रीक कंपन्याही ही उत्पादने आयात करुन चांगला फायदा कमवत आहेत. मात्र दूरदृष्टीने विचार करता चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे भारतात उत्पादन करणे गरजेचं आहे, असे मत गडकरींनी व्यक्त केले.

चीनवर विसंबून राहणे कमी केले नाही तर आपल्याला अधिक चांगल्या भविष्याचा विचार करता येणार नाही. सुरुवातील चिनी कंपन्या कमी आणि आकर्षक किंमतीमध्ये सामान पुरवतील. मात्र नंतर निर्मिती वाढवल्यावर याच कंपन्या जास्त दराने वस्तू विक्री करतील. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच वाहन उद्योगाने प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मनिर्भर बनने गरजेचे आहे. आत्मनिर्भर होणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी या वेबीनारमध्ये स्पष्ट केले.

भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. सीमेवर झालेल्या हिंसक घटनांमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर दुसरीकडे चीनचे ४३ जवान ठार अथवा जखमी झाले आहेत. चीनविरोधात भारतीयांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. म्हणून अनेक ठिकाणी चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था