चीनच्या कुरापतींचा मुखभंग करण्यासाठी भारताची नवी रणनीती; सैन्य दलांच्या प्रमुखांची राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत – चीन यांच्यातील हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव अद्याप कमी झालेला नसून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तणाव असल्याने भारत यापुढे चीनच्या कुरापतीला तोंड देण्यासाठी वेगळी रणनीती आखणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. संरक्षण मंत्रालयाची तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांशी आज बैठक पार पडली. सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील या बैठकीला उपस्थित होते.

बिपीन रावत यांच्यासहित तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची रविवारी भेट घेतली. राजनाथ सिंग सोमवारी रशिया दौऱ्यासाठी जाणार असून त्याआधी ही भेट घेण्यात आली आहे. यावेळी राजनाथ सिंग यांना लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सर्व प्रमुखांना नियंत्रण रेषेजवळ हवाई तसेच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यात सांगण्यात आले आहे.

चीनने नियंत्रण रेषेवर पुन्हा कुरापत काढली तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत अशी माहिती बैठकीनंतर सूत्रांनी दिली. लडाख किंवा इतर ठिकाणी चीनने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचेही सूत्रांनी सांगितलं आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.

याबाबत माजी लष्कर प्रमुख व्ही. पी. मलिक म्हणाले, “सैन्यन्यमाघारीची प्रक्रिया जलद गतीने पार पडली नाही, तर गालवनमधील घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक असते. एखादी लहानशी घटनाही संघर्षांची ठिणगी टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकते.’’

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था