चीनच्याही वृत्तमाध्यमांवर बंदी घाला; इंडियन न्यूज पेपर सोसायटीचा आग्रह

भारतीय माध्यमांमध्ये चीनी गुंतवणूकही नकोच


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनने भारतीय प्रसार माध्यमांवर बंदी घातल्याने त्याला जशास तसे उत्तर देत चीनी माध्यमांवरही बंदी घालण्यासाठी इंडियन न्यूज पेपर सोसायटी आक्रमक झाली आहे.

चीनने भारतीय वृत्तपत्रे आणि त्यांच्या वेबसाईट्स यांच्यावर पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे आता कोणतेही भारतीय वृत्तपत्र, किंवा प्रसारमाध्यम अथवा त्यांच्या वेबसाईट्स आता त्या देशात दिसू शकत नाहीत. चीनच्या या कारवाईचा इंडियन न्यूजपेपर सोसायटीने तीव्र निषेध केला आहे. चीनने व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कच्या माध्यमावरही ऍडव्हान्स फायरवॉल हे सुधारित तंत्रज्ञान उपयोगात आणून बंदी घातली आहे. त्यामुळे त्या माध्यमातूनही भारतीय वृत्तपत्रे दिसू शकत नाहीत.

चीनच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही चीनची सर्व वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे आणि त्यांच्या वेबसाईट्स यांच्यावर पूर्ण बंदी घालावी. कोणत्याही प्रकारे चीनी प्रसारमाध्यमांना भारतात प्रवेश देऊ नये. तसेच चीनने भागीदारी किंवा अन्य मार्गाने भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये गेलेल्या गुंतवणुकीवरही त्वरित बंदी घालावी असे आवाहन इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांनी एका पत्रकाद्वारे केंद्र सरकारला केली आहे.