चिनी सैन्याच्या हालचाली, कुरापती शोधण्यात महत्त्वाचे लोकेशन
वृत्तसंस्था
लेह : भारत – चीन हिंसक संघर्षानंतर तणाव निवळण्यासाठीच्या प्रयत्नांना चीनने खीळ घातली. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने आगळीक करून एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत चिनी सैन्याचा हा डाव उधळून लावला.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीन काही भागातून मागे हटला होता. पण पँगाँग टीएसओमध्ये चिनी सैन्य तळ ठोकून होते. त्यामुळे या भागात संघर्षाच भडका पुन्हा उडू शकतो, असा इशारा सातत्याने तज्ज्ञांकडून दिला जात होता. अखेर २९-३० ऑगस्टच्या रात्री पुन्हा ही घटना घडली.
नेमका परिसर आहे काय?
पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्र एक निसर्गरम्य परिसर आणि भारतीय सैन्यासाठी strategically महत्त्वाचा आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘३ इडियटस’चा महत्वाचा सीन चित्रीत झाला होता. लडाखला येणारे पर्यटक या तलाव क्षेत्राच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतात. पण याच तलावावरुन भारत आणि चीनमध्ये वाद आहे. या तलावामधून दोन्ही देशांची सीमारेषा जाते.
पँगाँग टीएसओ तलावाचा ४५ किलोमीटरचा भाग भारताच्या नियंत्रणाखाली आहे तर उर्वरित भाग चीनच्या नियंत्रणाखाली येतो. सध्या पँगाँग तलावाच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर क्षेत्र मुख्य कळीचा मुद्दा बनला आहे. कारण चीनने इथे फिंगर फोरपर्यंत घुसखोरी केली आहे.
पँगाँग तलाव समुद्रसपाटीपासून १४,५०० फूट उंचीवर आहे. या तलावाजवळ हाताच्या बोटांचा आकार जसा असतो, तसे आठ डोंगर आहेत. भारत-चीनमधला सीमावाद हा फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान आहे. फिंगर फोर पर्यंतचा भाग भारताच्या ताब्यात आहे. फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान दोन्ही देशांचे सैन्य पेट्रोलिंग करते.
चीनने फिंगर चार पर्यंत रस्ता बनवला आहे. या तलावाच्या किनाऱ्याजवळ भारतीय सैन्याचा बेस कॅम्प आहे. फिंगर चार ते आठ दरम्यान भारतीय सैनिक गस्त घालण्यासाठी पायीच चालत जातात. पाच मे नंतर चिनी सैन्य फिंगर चार पर्यंत आले आहे. चिनी सैन्याच्या या घुसखोरीमुळे भारताला आता फिंगर आठपर्यंत गस्त घालण्यावर मर्यादा आल्या आहेत. फिंगर चार ते आठमध्ये एकूण आठ किलोमीटरचे अंतर आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने फिंगर फोर ते फिंगर आठ दरम्यान कायमस्वरूपी बंकर, पीलबॉक्सेस आणि टेहळणी चौक्या उभ्या केल्या आहेत. हे सर्व बांधकाम पाडून चिनी सैन्य त्यांच्या मूळच्या फिंगर आठच्या जागी माघारी परतणे हा तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. पण हे इतके सोपे सुद्धा नाही असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.