ग्रामीण भारताला पंतप्रधानांची भेट, हजार दिवसांत प्रत्येक गावापर्यंत आप्टीकल फायबर जोडणी

डिजीटल इंडियाचा नारा देताना देशातील ग्रामीण भाग मागे राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाला अनुपम भेट दिली आहे. आगामी 1000 दिवसांमध्ये, देशातील प्रत्येक गावापर्यंत ऑप्टीकल फायबर जोडणी पोहचेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डिजीटल इंडियाचा नारा देताना देशातील ग्रामीण भाग मागे राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाला अनुपम भेट दिली आहे. आगामी 1000 दिवसांमध्ये, देशातील प्रत्येक गावापर्यंत ऑप्टीकल फायबर जोडणी पोहचेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, २०१४ पूर्वी देशातील केवळ साठ ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबलने जोडल्या होत्या. गेल्या पाच वर्षात, सुमारे दीड लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबलने जोडल्या आहेत. देशाच्या संतुलित विकासासाठी डिजीटल इंडियामध्ये ग्रामीण भारत आणि खेड्यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. यासाठी आम्ही ऑप्टीकल फायबर नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहोत. आगामी हजार दिवसांत सर्व 6 लाख गावांमध्ये हे पोहचेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या महत्त्वाच्या घोषणेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण खात्याचे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ट्वीट केले की, आज आपण 1000 दिवसांत ऑप्टीकल फायबर इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील सर्व गावं जोडण्याची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे सोपविली आहे. हे डिजीटल इंडियासाठी गेमचेंजर ठरणार आहे.

देशात 1,300 द्वीप आहेत. त्यांचे भौगोलिक स्थान आणि देशाच्या विकासातील महत्त्व लक्षात घेता, काही द्वीपांवर नवीन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. जलद विकासासाठी आम्ही काही द्वीप निश्चित केले आहेत. अंदमान आणि निकोबारमध्ये वेगवान इंटरनेटसाठी समुद्राखालून जोडणी केली आहे. पुढे, आम्ही लक्षद्वीपला जोडणार आहोत, असे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन भाषण करताना म्हणाले.

या आठवड्यातच पंतप्रधानांच्या हस्ते चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार बेटांना जोडणाऱ्या आतापर्यंतच्या पहिल्याच समुद्राखालील ऑप्टीकल फायबर जोडणीचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता या केंद्रशासित प्रदेशाला दिल्ली आणि चेन्नईप्रमाणेच वेगवान इंटरनेट मिळेल. लक्षद्वीपला हाय स्पीड इंटरनेट पुरवण्याच्या घोषणेविषयी बोलताना, रवी शंकर प्रसाद म्हणाले, पंतप्रधानांनी या द्वीपांना सबमरीन ऑप्टीकल केबल जोडणी पुरवण्यासाठी हजार दिवसांचे लक्ष्य दिले आहे. अंदमान आणि निकोबारला दूरसंचार विभागाने पुरवलेल्या जोडणीप्रमाणेच हे कार्यसुद्धा लवकर पूर्ण करण्यात येईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*