एका बाजुला लॉकडाऊन वाढविल्याच्या निर्णयामध्ये सहभागी करून घेतले नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस नाराज असताना मुंबईतील संचारबंदीच्या निर्णयावरून आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख राज्याचे दौरे करण्यात व्यस्त असताना त्यांना विश्वासात न घेताच मुंबईतील पोलीसांना कामाला लावले गेले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका बाजुला लॉकडाऊन वाढविल्याच्या निर्णयामध्ये सहभागी करून घेतले नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस नाराज असताना मुंबईतील संचारबंदीच्या निर्णयावरून आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख राज्याचे दौरे करण्यात व्यस्त असताना त्यांना विश्वासात न घेताच मुंबईतील पोलीसांना कामाला लावले गेले आहे.
राज्यातील सगळे निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच घेत असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत. प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नाराजी जास्त आहे. याचे कारण म्हणजे उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेली चर्चा मंत्र्यांपर्यंत पोहोचतच नाही. मंत्र्यांनी विचारल्यावर मुख्यमंत्री पवारसाहेबांशी बोलणे झाल्याचे सांगून त्यांचे तोंड बंद करतात.
मुंबईत दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर न फिरण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी पोलीसांवर आहे. मात्र, हा निर्णय घेताना गृहमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नापसंती व्यक्त करत आहे.
मुख्यमंत्र्यांची समजूत काढून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांना कॉंग्रेसचाही पाठिंबा होता. मात्र, या सगळ्यामध्ये उध्दव ठाकरे यांनी स्वत:ची प्रतिमा जनतेची काळजी असणारा अशी करून दिली आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर वाढत असलेल्या चीनी व्हायरसच्या उद्रेकास इतर मंत्र्यांना जबाबदार धरले जाण्याची भीती वाटत आहे. त्यांनी लॉकडाऊनबाबत सुरूवातीपासून सावध पवित्रा घेतला आहे.
उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून राज्यात टाळेबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्याच्या निर्णय घेतला. मात्र, शरद पवार किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना याबाबत माहितीच नव्हती. मुंबईत दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर न फिरण्याचा नियम लागू केला.याची अंमलबजावणी करत पोलिसांनी हजारो वाहने जप्त केली. त्यामुळे पोलीसांवर आणि पर्यायाने गृहमंत्री देशमुख यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या निर्णयाची कल्पनाही त्यांना दिली नव्हती.
ठाण्यातील सर्व निर्णय ट्विटरवर पहिल्यांदा टाकून आपणच ते घेत असल्याचे भासविणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याचे माहितच नव्हते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात यावरून मतभेद झाले आहेत.