गलवानमधील हिंसक संघर्षास चीनच जबाबदार; द्विपक्षीय कराराचाही भंग

  • भारताने जगासमोर मांडली परखड भूमिका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत – चीन हिंसक संघर्षास चीनी सैनिकांचा आक्रस्ताळेपणाच कारणीभूत आहे. चीन मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक मोठय़ा प्रमाणावर सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव करीत आहे. चीनची ही कृती भारत – चीन द्विपक्षीय करारांमधील तरतुदींचे पूर्णपणे उल्लंघन करणारी आहे, अशी परखड भूमिका भारताने जगासमोर मांडली आहे. गालवनमधील १५ जूनच्या हिंसाचाराला चीनच जबाबदार असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ऑनलाइन संवाद साधताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घडलेल्या आतापर्यंतच्या घटनांची अधिकृत माहिती दिली. गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्ष चीनमुळेच घडल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले.

श्रीवास्तव म्हणाले, “मे महिन्याच्या सुरवातीला चीनने गलवान खोऱ्यात भारताच्या सर्वसाधारण आणि पारंपरिक पद्धतीने गस्त घालण्याच्या पद्धतीत अडथळे आणले. त्याचबरोबर मे महिन्याच्या मध्यावर पश्चिम क्षेत्रातील ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याचा प्रयत्नही चीनने केला, चीनच्या या कारवायांबद्दल भारताने राजनैतिक आणि लष्करी पातळीवर विरोध केला आणि ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याची कारवाई भारताला पूर्णपणे अमान्य असल्याचे चीनला ठणकावण्यात आले होते.”

त्यावर भारत आणि चीनचे सैन्य सीमेवर एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी त्याबाबतचा प्रश्न योग्य रीतीने सोडविण्यासाठी चीन आणि भारत एकत्रित काम करण्यास तयार आहेत. शंका, संशय आणि मतभेद या बाबी दोन्ही देशांमधील नागरिकांविरोधात आहेत, अशा शब्दांत चीनने गुरुवारी सलोख्याचा सूर आळवला.

श्रीवास्तव यांनी माहिती दिली, की ६ जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील तणाव कमी करणे आणि सैन्य मागे घेण्यावर परस्पर सहमती झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर करणे आणि जैसे थे स्थितीला बाधा आणणारी कोणतीही कारवाई टाळण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले होते; परंतु सहमती तोडत चीनने गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे बांधकाम करण्यास सुरवात केली.

चीनचा बांधकाम करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चिनी सैन्याने १५ जूनला हिंसक संघर्ष केला. त्यानंतर गलवान त्या भागात दोन्ही देशांनी मोठय़ा प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. त्याचबरोबर लष्करी आणि राजनैतिक वाटाघाटीही सुरू आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*