खुर्ची गेल्याने कॉंग्रेस तडफडतेय, म्हणूनच फेसबुकसारखी प्रकरणे काढतेय, ज्योतिरादित्य शिंदे यांची टीका

खुर्ची गेल्याने आता काँग्रेस तडफडत आहे. काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावल्यामुळेच आता करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच न उरल्याने हल्ली फेसबुकसारखी प्रकरणे काँग्रेस काढत आहे, अशा शब्दात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.


विशेष प्रतिनिधी

इंदूर : खुर्ची गेल्याने आता काँग्रेस तडफडत आहे. काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावल्यामुळेच आता करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच न उरल्याने हल्ली फेसबुकसारखी प्रकरणे काँग्रेस काढत आहे, अशा शब्दात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्ताचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला होता. यावर शिंदे म्हणाले, फेसबुक, ट्विटर आणि इंटरनेट हे माध्यम मुक्त माध्यम आहे. तेथे कोणीही आपले मत मांडू शकतो. मात्र, कुणीही आक्षेपार्ह मत मांडू नये यावर या माध्यमाचे नियंत्रण असायला हवे.

बाबरी मशीद प्रकरणावरूनही शिंदे यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनाच हे माहिती नाही की त्यांच्या नेत्याने म्हणजे राजीव गांधी यांनी काय केले आणि काय केले नाही. एकीकडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ म्हणत आहेत की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशीदीचे कुलुप तोडले होते. तर, दुसरीकडे शशी थरूर म्हणत आहेत की त्यांनी कुलुप तोडलेले नाही. काँग्रेसला स्वत:लाच माहिती नाही की त्यांच्या नेत्याने काय केले आणि काय नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची शिंदे यांनी प्रशंसा करताना शिंदे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले आहे. अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच चीनला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हे पाहून काँग्रेस पक्ष आता अपयशाकडे जाऊ लागला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*