विशेष प्रतिनिधी
नाशिक : फार पूर्वीपासून आम्ही खडसेंसोबत राज्यात पक्षाचे काम करीत आलो आहे. प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतीने त्यावेळच्या प्रतिकूल स्थितीत आम्ही राज्यात पक्षाची उभारणी केली. पक्षाला आज जे चांगले दिवस आलेत, ते खडसेंसारख्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचे फलित आहे,असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
प्रा.सुनील नेवे लिखित `जनसेवेचा मानबिंदू-एकनाथराव खडसे`या पुस्तकाचे प्रकाशन आज गडकरींनी नागपूरहुन ऑनलाइन पध्दतीने सहभागी होत केल. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरहून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,भोकरदनहुन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभू बागडे औरंगाबादहून सहभागी झाले होते.
पुस्तक प्रकाशनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम मुक्ताईनगरात खडसेंच्या फार्म हाऊस परिसरात झाला. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले, खडसेंना त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष,संकटांना तोंड द्यावे लागले. व्यक्तीगत स्तरावर अनेक संकटांवर त्यांनी सक्षमपणे मात केली. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे पक्षाच्या उभारणीत योगदान आहे. नाथाभाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत, मात्र ते शतायुषी व्हावेत,असे गडकरी म्हणाले,
ना अहंकार,ना गर्व- मुनगंटीवार
यावेळी चंद्रपूरहून बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, कार्यकर्त्यांवर भावाप्रमाणे प्रेम करणारा नेता म्हणून खडसेंची ओळख आहे. विरोधी पक्षात असतांना त्यांनी तत्कालीन सरकारवर केलेले आरोप,टीका हे त्यांचे शब्द नव्हते तर बाण होते त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमुळे त्यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेण्यास त्या-त्या सरकारला भाग पाडले.
ते विरोधी पक्षनेते असतांना अनेकदा त्यांच्या निवासस्थानी बैठका होत,पण प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या घरी गेलो असता ते खुर्चीवरून उठून मला त्या खुर्चीवरची जागा देत,एवढे ते मोठे आहेत, ना कुठला अहंकार, ना गर्व असे त्यांचे व्यक्तीमत्व,रावसाहेब दानवे व हरिभाऊ बागडे यांनीही मनोगत व्यक्त करतांना खडसेंनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.