कॉंग्रेसमधील वाद धुमसतोयच, जी-२३ क्लबमधील नेते बंडाच्या पवित्र्यात

कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांचीच पुन्हा हंगामी अध्यक्षपदी निवड करून पक्षाने आजचे मरण उद्यावर ओढवले असे म्हटले जात होते. परंतु, पक्षातील वाद अद्यापही धुमसतोच असून जी-२३ क्लबमधील नेते बंडाच्या पावित्र्यात आहेत. या नेत्यांनी राज्यसभेतील राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी आपली पुढील रणनिती तयार केल्याचे बोलले जात आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांचीच पुन्हा हंगामी अध्यक्षपदी निवड करून पक्षाने आजचे मरण उद्यावर ओढवले असे म्हटले जात होते. परंतु, पक्षातील वाद अद्यापही धुमसतोच असून जी-२३ क्लबमधील नेते बंडाच्या पावित्र्यात आहेत. या नेत्यांनी राज्यसभेतील राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी आपली पुढील रणनिती तयार केल्याचे बोलले जात आहे.

कपिल सिब्बल, शशी थरूर यांच्यासह जी-२३ क्लबमधील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या निवसस्थानी बैठक घेतली. या बैठकीत मुकुल वासनिक आणि मनीष तिवारी यांच्यासह सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करणारे इतरही काही नेते हजर होते.

पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर सोनिया गांधी अतिशय नाराज आहेत. सोनिया गांधीची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती केल्यानंतर त्यांचे स्थान पक्षात मजबूत झाले आहे. पक्षात त्यांना विरोध करणाऱ्या नेत्यांसाठी आता पक्षात स्थिती बिकट झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता हे नेते करू किंवा मरू या स्थितीत पोहोचले आहेत.

नेतृत्व बदलाची मागणी करणारे पत्र पाठविणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये प्रामुख्याने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व उपनेते आनंद शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सोनिया गांधींनी मल्लिकार्जुन खर्गे यांना अचानक राज्यसभेत आणल्याने हे दोघे नाराज आहेत. २०१६ मध्ये चौथ्यांदा राज्यसभा मिळाली, तेव्हा २०२१ मध्ये आझाद यांच्या जागी आपण विरोधी पक्षनेते होऊ, असे शर्मा यांना वाटत होते. खारगे यांच्या येण्याने त्यांचाही स्वप्नभंग झाला. त्यामुळे बंडखोरीच्या हालचाली शर्मा यांच्या लोधी इस्टेटमधील बंगल्यातूनच झाल्या. शर्मा यांनीच पुढाकार घेऊन अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत प्रदीर्घ बैठका घेतल्या. आझाद, कपिल सिब्बल, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकजण शर्मा यांच्या घरी रात्रीच्या भोजनाच्या निमित्ताने अनेक आठवडे एकत्र भेटत होते.

मनिष तिवारी, कपिल सिब्बल व शर्मा यांनी पत्राचा मसुदा तयार केला. पंधरा वेळा त्यात दुरुस्त्या केल्या गेल्यावर ६ ऑगस्टला पत्र सोनिया गांधींना पाठविले. सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेता गुलाम नबी आजाद, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार आनंद शर्मा, तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर, श्री आनंदपुर साहिबचे खासदार मनीष तिवारी, पी. जे. कुरियन, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंह हुड्डा, पंजाबच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोइली, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजय सिंह, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित आणि विवेक तन्खा या नेत्यांचा समावेश आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*