कॉंग्रेसचे मतपेढीचे राजकारण, दहशतवादाचे केले तुष्टीकरण : नितीन गडकरी

देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा महत्वाची आहे. कॉंग्रेसने मात्र मतपेढीचे राजकारण आणि आतंकवादाचे तुष्टीकरण केल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.


विशेष प्रतिनिधी

पुणे : देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा महत्वाची आहे. कॉंग्रेसने मात्र मतपेढीचे राजकारण आणि आतंकवादाचे तुष्टीकरण केल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र जनसंवाद या व्हर्च्युअल रॅलीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या २० हजारहून अधिक बूथ प्रमुख आणि वीस लाखांहून अधिक नागरिकांना मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील प्रथम वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश प्रभारी सरोज पांडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत आदी पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

गडकरी म्हणाले, ‘या देशात गुलामगिरीचे प्रतिक असणारे ३७० कलम मोदी सरकारने काढून टाकले. थेट लढून भारताचा मुकाबला करता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर जम्मू कश्मिरमध्ये पाकिस्तानने दहशतवादी संघटना  आयात करण्याचे धोरण आखले. पण आज सरकार खंबीर आहे. आपल्या कृतीतून मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. गेल्या सहा वर्षांत आतंकवादाचे समूळ नष्ट करून आणि जम्मू कश्मिरचा विकास करण्याचे सरकारचे धोरण आहे.

गडकरी पुढे म्हणाले ‘देश आर्थिक संकटातून चालला आहे. कोरोनाची लढाई महत्वाची आहे. त्याविरोधात आपल्याला यश मिळेल. जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत लढायचे आहे. नकारात्मकता, नैराश्यावर मात करायची आहे. आत्मविश्वास वाढविला पाहिजे. तसा विश्वास समाजात आणि देशात निर्माण झाला पाहिजे. देशाच्या हितासाठी पंतप्रधानांनी कठोर निर्णय घेतले. त्यात राजकारण केले नाही. संघर्षात यशस्वी होण्यासाठी सकारात्मकता महत्वाचे आहे.

पश्चिम सुरत-अहमदनगर १२ हजार कोटी रुपयांचा मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, मुंबई परिसरात  नवीन विकासाचा मार्ग उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात तत्परतेने रुग्णालयांची निर्मिती, पीपीई किट निर्मिती, वेळेत लॉकडाउन, लॉकडाउन काळात साधनांची उपलब्धता, मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोदींचे उत्तम नियोजन आणि दूरदृष्टी या मुळे अन्य देशाच्या तुलनेत कोरोनाचा प्रतिबंध करण्यात यश मिळाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*