उत्तर महाराष्ट्रात भाजपने आणले शिवसेनेच्या वाघास जेरीस, काँग्रेस, राष्ट्रवादीचीही केली गोची

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोना संकट कायम असतांना वेगवेगळे प्रश्न घेऊन भाजपने महाविकास आघाडी त्यातही विशेषत्वाने शिवसेनेला अंगावर घेण्याचे धोरण आखलेले दिसते. भाजपचे हे आक्रमक धोरण आणि अंतर्गत बेबनाव,वर्चस्ववाद,हेवेदाव्यामुळे शिवसेनेचा वाघ चांगलाच घायाळ झाला आहे. राज्याच्या पातळीवर अंतिम परिक्षा, देवस्थाने खुली करणे,राम मंदीराच्या भूमिपूजनाला उध्दव ठाकरे यांना आमंत्रित न करणे यासारख्या विषयात सेनेने दिलेल्या कथित धोक्याचा बदला उत्तर महाराष्ट्रात भाजप घेत आहे.

सामान्यांच्या प्रश्नांबाबत आक्रमक असलेल्या आणि नियोजनबध्द धोरण राबवत विकास करणाऱ्या भाजपला बदनाम करण्याची एकही संधी महाविकास आघाडी सोडत नाही. भाजपही या आघाडीला पुरून उरत आहे. भाजपच्या रडारवर आपला एकेकाळचा मित्रपक्ष असलेला शिवसेना तर आहेच, पण पारंपारिक प्रतिस्पर्धी कॉग्रेस,राष्ट्रवादीलाही सोडलेले नाही. या तिघांचीही कोंडी करण्यास भाजप उत्तर महाराष्ट्रात यशस्वी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर भाजपचा वरचष्मा आहे. केंद्र सरकारच्या बळावर खासदारांकडून वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा करून त्या पूर्णत्वास नेण्याकडे भाजपचा कल राहिला असून चांगली कामे उत्तर महाराष्ट्रात होऊ लागली आहे.. काही कामे प्रगतीपथावर आहे. हे आशायदायक वातावरण एकीकडे असतांना दुसरीकडे अंतर्गत बेबनाव,वर्चस्ववाद,हेवेदाव्यामुळे शिवसेनेचा वाघ जेरीस आला आहे.

सर्वच बाबतीत भाजपचा वरषष्मा

संख्याबळाचा विचार केला तर सेनेपेक्षा भाजप वरचढ आहे. चार खासदार, आठ आमदार आहेत, दोन जिल्हा परिषदा, दोन महापालिका,दोन जिल्हा बॅंका, एक दूध संघ,दहा नगरपालिका, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवर भाजपचा वरचष्मा आहे. तुलनेत सेनेचे चार आमदार आहेत. गुलाबराव पाटील जळगावचे तर अब्दुल सत्तार(सिल्लोड-मराठवाडा) हे धुळ्याचे पालकमंत्री आहेत. दोघांकडील खातेदेखील महत्वाचे आहेत. गुलाबरावांकडे पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते आहेत. सत्तार हहे राज्यमंत्री असून त्यांच्याकडे महसूल,ग्रामविकास ही खाती आहेत. कॉग्रेसचे अँड.के.सी.पाडवी हे नंदुरबारचे पालकमंत्री आहेत. आदिवासी विकास विभाग हे मोठे खाते त्यांच्याकडे आहे. कॉग्रेसचे चार आमदार असून नंदुरबारात दोन तर जळगाव व धुल्यात प्रत्येकी एक आमदार आहे.

दिग्गज नेत्यांच्या फौजेमुळे महाआघाडीची गोची

गिरीष महाजन,अमरीशभाई पटेल,डॉ.सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे, जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपकडे आहेत. त्यातुलनेत सेनेकडे नेते कमी आणि कार्यकर्ते आधिक आहेत. नेत्यांमध्ये बेबनाव अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर आहेत. जळगावात भाजपच्या अधिपत्याखालील महापालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेना एकसंघपणे लढतांना दिसत नाही. समस्या प्रचंड आहेत, नागरिकांमध्ये असंतोष आहे. पण त्याला दिशा देण्यात सेनेसह सगळे विरोधी पक्ष कमी पडत आहे.
मटनपार्टीद्वारे मारला ताव अन् सत्यनारायण पूजन
धुळ्यात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्यावेळी झालेल्या मटनपार्टीवरून उपजिल्हाप्रमुख ज्ञानाभाऊ सोनवणे यांनी भाजपला पेचात पकडले. राम मंदीराचे भूमिपूजन होत असतांना आणि श्रावण महिन्यात भाजपचे सदस्य मटणावर ताव मारीत असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे शुध्दीकरण करण्यासाठी सत्यनारायण पूजा घातली,पण त्यांना इतर सैनिकांकडून म्हणावी तशी ताकद दिल्याचे दिसले नाही.

पालकमंत्री पडले एकाकी

अभाविप कार्यकर्त्यांवर लाठीमाराच्या घटनेत सेनेच्या पालकमंत्र्यांच्या बचावासाठी सैनिक त्वेषाने पुढे आलेले दिसले नाही. जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील व चिमणराव पाटील या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट आहे. मंत्रीपदाची इच्छा चिमणरावांनी कधी लपवून ठेवली नाही. त्यामुळे गुलाबरावदेखील त्यांची कोंडी करण्याची संधी सोडत नाही. घरात बसून कोरोनावर मात करता येणार नाही, मैदानावत उतरावे लागले. हे त्यांचे चिमणरावांच्या एरंडोल मतदारसंगात केलेले विधान त्याचेच द्योतक आहे.

सेनेच्या अंतर्गत मतभेदाचा होणार फायदा
नंदुरबारात कॉग्रेस आणि शिवसेनेत जुपंली आहे. जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र आल्याने भाजपला सत्तेबाहेर ठेवता आले,मात्र ही आघाडी भुसभुसीत पायावर उभी आहे, हे सभापतीपदाच्या वादावरून दिसून आले. शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम यांना बांधकाम व अर्थ समितीचे सभापतीपद देतांना पाडवी व रघुवंशी यांनी एकत्र येत अभिजित पाटील यांना अंधारात ठेवले आणि पदाची अदलाबदल केली. जाहीर पत्राद्वारे त्यांनी नाराजी व्यक्त केलीय शिवाय न्यायालयातदेखील धाव घेतली,त्यामुळे सेनेच्या अंतर्गत असे मतभेद आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*