अभिनेत्री कंगना राणावत हिला धमक्या देऊन सुरक्षा देण्याची वेळ आणल्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आठवली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिला धमक्या देऊन सुरक्षा देण्याची वेळ आणल्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आठवली आहे.
शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
कंगनाने मुंबईबाबत वक्तव्य केल्यावर राऊत यांनी कंगनाला धमक्या दिल्या होत्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगनाविरुध्द ‘जोडे मारो’ आंदोलन केले. ती मुंबईत कशी येते हे पाहून घेण्याची धमकी दिली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला थोबाड फोडण्याची धमकी दिली. यामुळे केंद्राने कंगनाला वाय सुरक्षा दिली आहे.
राऊत यांनी कंगनाचा उत्लेख हरामखोर असा केल्यावर तर संपूर्ण देशातून त्यांच्याविरुध्द संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी कंगना रनौत हिच्याबद्द अपशब्द वापरला. संजय राऊत यांनी वापरलेल्या शब्दावरुन कंगना हिच्या समर्थकांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. वापरलेल्या शब्दाबद्दल संजय राऊत यांनी माफी मागावी अशीही मागणी काहींनी केली.
त्यामुळे राऊत यांनी सपशेल माघार घेतली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या महान पुरुषांच्या विचारसरणीनुसार शिवसेनेने वाटचाल केली आहे. त्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. मात्र काहीजण खोडसाळपणे शिवसेनेने महिलांचा अपमान केला अशी चुकीची माहिती पसरवत आहेत.
‘हरामखोर’ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. मात्र, त्या मुलीने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी त्याबाबत विचार करेन, असेही संजय राऊत यांनी म्हटले.