अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही; अखेरपर्यंत संघर्ष; आरोग्य यंत्रणेची पोल खोलून पांडुरंग गेला…!!

 • टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनाने निधन

विशेष प्रतिनिधी

पुणे : टीव्ही ९ चा तरूण पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती.

ते ४२ र्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेत अँब्युलन्सच मिळाली नाही. पांडुरंग जीवनासाठी धडपडला पण जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. पुण्यासारख्या शहरातील आरोग्य यंत्रणेची ही भयावह अवस्था…!! त्याचीच पोल खोलून पांडुरंग गेला.

नेमकं काय घडलं?

 • पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास, त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचार.
 • पांडुरंग रायकर यांची २७ ऑगस्टला कोरोना चाचणी, मात्र अहवाल निगेटिव्ह
  दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला पांडुरंग रायकर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. गावी गेल्यावरही त्रास झाल्यामुळे कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह
  रविवार ३० ऑगस्टला रात्री त्यांना अँब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणले.
 • पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केले. जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरू होते, मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती.
 • रायकर यांना खाजगी हॉस्पिटलमधे दाखल करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरु केले. काल (मंगळवार १ सप्टेंबर) त्यांची ऑक्सिजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली.
  जम्बो हॉस्पिटलमधून अन्यत्र नेण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची गरज होती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी रात्री एक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाल्याचे सांगितलं गेले.
 • दुसरी अँब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत रात्रीचे बारा-सव्वाबारा वाजले होते.
  पहाटे चार वाजता अँब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरु झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
  दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँब्युलन्स उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आणि आयसीयूमधील डॉक्टरांचा ‘आम्ही निघत आहोत’ असा फोन आला.
 • पांडुरंगचे मित्र पत्रकार आणि नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्यांचं निधन झाल्याचं सांगितले. कार्डिॲक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

पांडुरंग रायकर यांची कारकीर्द

पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी ‘टीव्ही 9’ च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*