अ‍ॅपबंदीचे नाक दाबल्यावर चीनची तळमळ

भारतीय बाजारातून पैसे कमावून भारताच्याच लष्कराविरुध्द वापरणार्या चीनचे नाक दाबण्यास मोदी सरकारने सुरूवात केली आहे. त्यामुळे चीनची चांगलीच तळमळ सुरू झाली आहे.


वृत्तसंस्था

बीजिंग : भारतीय बाजारातून पैसे कमावून भारताच्याच लष्कराविरुध्द वापरणार्‍या चीनचे नाक दाबण्यास मोदी सरकारने सुरूवात केली आहे. त्यामुळे चीनची चांगलीच तळमळ सुरू झाली आहे.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या वैध आणि कायदेशीर हक्कांचे पालन करण्याची जबाबदारी भारत सरकारवर आहे, असा कांगावा कुरापतखोर चीनने सुरू केला आहे.

टिकटॉक, शेअरइट आणि यूसी ब्रॉसर यासह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. लडाखमधील सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारतीय सार्वभौमत्वाला या अ‍ॅपकडून धोका असल्याचा ठपका भारत सरकारने बंदी आदेशात ठेवला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी यासंदर्भात म्हटले की, ”भारताने जारी केलेल्या बंदी आदेशामुळे चीन सरकार गंभीर चिंतेत आहे. आम्ही परिस्थितीचे आकलन आणि पडताळणी करीत आहोत. विदेशात काम करणार्या चिनी कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे, स्थानिक कायदे आणि नियम यांचे कसोशीने पालन करावे, असे चीन सरकारकडून नेहमीच सांगण्यात येत असते.”

“आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या वैध व कायदेशीर हक्कांची जपणूक करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. चीन आणि भारत यांच्यातील संबंध दोन्ही देशांसाठी लाभदायक आहेत. तथापि, ही बाब ताज्या कार्यपद्धतीतून दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे,” असे लिजियान म्हणाले.

टिकटॉकने म्हटले की, भारत सरकारने जारी केलेल्या बंदी आदेशाच्या पालनाची प्रक्रिया सुरू आहे. वास्तविक आम्ही कोणत्याही वापरकर्त्याची माहिती चीनसह कोणत्याही विदेशी सरकारला दिलेली नाही.आम्ही डाटा गोपनीयता आणि सुरक्षात्मक गरजा यांचे पालन करीत राहू. मात्र, भारत सरकारच्या बंदी आदेशानंतर लोकप्रिय टिकटॉक अ‍ॅप विविध ‘अ‍ॅप स्टोअर्स’वरून काढून टाकण्यात आले आहे. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर या लोकप्रिय अ‍ॅप स्टोअर्सवरून हे अ‍ॅप हटविण्यात आले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*