अजोय मेहतांना विरोध, त्यात संजयकुमारांची नियुक्ती; महाआघाडीतील बडे मंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराज

  • मंत्र्यांनी लावलेली फिल्डिंग मुख्यमंत्र्यांनी भेदली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजोय मेहता यांना ठाकरे – पवार सरकारमधील काही बडया मंत्र्यांचा असलेला विरोध अद्यापही शमलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच त्यांना मिळालेले नवे मानाचे स्थान हा आता असंतोष वाढला आहे. त्यातच मंत्र्यांनी एका अधिकाऱ्यासाठी लावलेल्या “फिल्डिंगमधून शॉट मारून” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजयकुमार यांची नियुक्ती मुख्य सचिवपदी केल्याने बड्या मंत्र्यांचा भडका उडाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मेहता यांची ‘सहाव्या मजल्यावर’ नियुक्ती केल्याने केलेल्या नियुक्तीमुळे महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्यांनी रात्रीच मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीसाठी खूप वेळ पाठपुरावा केल्यानंतर अखेर रात्री उशीरा या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाल्याचे समजते.

राज्याचे सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ न देता येत्या १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता आहे. त्यासाठीच अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते नव्या भूमीकेत प्रामुख्याने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जीवाचा आटापिटा

मात्र, मुख्य सचिव पदाची मुदतवाढ न मिळालेल्या अजोय महेता यांना उद्धव ठाकरे यांनी सल्लागार नेमून सहाव्या मजल्यावर मानाचे स्थान दिल्याने काही बडे मंत्री नाराज झाले. त्यांनी काल तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली. भेटीची ही विनंती आणि पाठपुरावा इतका होता की, अखेर दादर परिसरातील जुन्या महापौर निवासात मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मंत्र्यांना भेटण्यास मान्यता दिली. सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाचे राज्याचे प्रमुख त्यांच्या दोन सहकार्यांसह तेथे गेले होते. या सर्वांनी सुमारे दोन तास आपल्या तक्रारींचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला.

मेहता दिशाभूल करतात, सर्व अधिकार स्वतःच्या हातातच ठेवतात. मंत्र्यांचा मान राखत नाहीत, अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आल्या. राज्याच्या मुख्य सचिवपदी एका मराठी अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी, यासाठी काँग्रेसचा आग्रह होता. तर आधी मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध ठेवणाऱ्या अन्य एका अधिकार्यासाठी ‘फिल्डींग’ लावणे सुरू होते. मात्र, या गटांचे काहीही न ऐकता उद्धव ठाकरे यांनी संजयकुमार यांची निवड केली.

मेहता दूर झाले असले तरी त्यांचे सहाव्या मजल्यावर असणे मंत्रिमंडळातील डझनभर सदस्यांना पटलेले नाही. मुख्य सचिवच राज्य चालवत असल्याचा आरोप याआधी झाला होता. तसेच मेहतांच्या विरोधात काँग्रेसमधील काही मंत्र्यांनी तर पहिल्याच लॉकडाऊनमध्ये आघाडी उभारली होती. प्रशासनाचा अनुभव नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले सहा महिने मेहतांवर अवलंबून असल्याचा आरोप आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*