६५ कोटी गरीबांपर्यंत पोहोचले मोफत ७२ लाख टन धान्य; १.६ लाख टन डाळींचाही राज्यांना पुरवठा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेंतर्गंत केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारांना ७२.४४ लाख टन अन्नधान्य पोहोचविले आहे. त्यामध्ये १.६६ लाख टन डाळींचाही समावेश आहे. आतापर्यंत सुमारे ६५ कोटींहून अधिकजणांपर्यंत हे मोफत धान्य पोहोचल्याची माहिती केंद्राकडे जमा झाली आहे.

केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यांना ६२.२५ लाख टन तांदूळ, ८.६१ लाख टन गहू आणि १.६६ लाख टन डाळी पोहोचविलेल्या आहेत. तांदूळ आणि गहू सुमारे साठ कोटी, तर डाळीं सुमारे पाच कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला असल्याची माहिती राज्यांनी केंद्राला दिलेली आहे.

चीनी व्हायरसच्या या महासंकटामध्ये कोणताही गरीब विनाअन्न राहू नये, याकरिता केंद्र सरकारने १.७० लाख कोटी रूपयांची पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर केली होती. त्यामध्येच पंतप्रधान गरीब अन्न योजनेचाही अंतर्भाव होता. यानुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जे अन्नधान्य मिळते आहे, त्याच्याव्यतिरिक्त प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ व गहू आणि एक किलो डाळ पुढील तीन महिन्यांसाठी (एप्रिल ते जून) देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यानुसार राज्यांना १२५.८८ लाख टन धान्य व डाळी दिल्या जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत (७ मे अखेरची माहिती) ७२.४४ लाख टन धान्य दिले गेले आहे. सुमारे अडीच हजार रेल्वे मालगाडीतून हा पुरवठा केल्याची माहिती दिली गेली आहे.

सुमारे ८० कोटी लोकांपर्यंत हे मोफत अन्न पोहोचले जाईल, असा सरकारचा अंदाज आहे. ही संख्या भारतीय लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश इतकी होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात