ठाकरे – पवार सरकारकडून मराठा समाजाची सर्व बाजूंनी फसवणूकच

  • खासदार संभाजीराजेंच चौफेर हल्लाबोल
  • सारथी संस्था बुडवली, पाटील महामंडळला काही दिले नाही
  • छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले, पण आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे यांनी ठकरे – पवार सरकारवर अक्षरश: चौफेर हल्ला चढवलाय. सारथी संस्था बुडवली. मराठा समाजाची सर्व बाजूंनी फसवणूक केली. राज्य सरकारच्या हातात असताना काही गोष्टी का करत नाही?, असा परखड सवाल त्यांनी केला.

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आता मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. यावेळी त्यांनी शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार?, असा सवाल विचारला आहे.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, ‘छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांसाठी जे आरक्षण दिले होते, त्यात मराठा समाजच वंचित राहिला आहे. आता या मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? माथाडी कामगार भवनमध्ये माझी नरेंद्र पाटील यांच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळेस नरेंद्र पाटलांनी मला नेतृत्व करण्यास सांगितले. त्यावेळी देखील मी त्यांना हाच शब्द दिला होता की मी नेतृत्व करणार नाही. खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजासोबत राहिल असे सांगितले होते. आता ती वेळ पुन्हा आली आहे. त्यावेळी सर्व मराठा संघटना एकत्र आल्या आणि येथूनच आझाद मैदानावर महामोर्चा गेला. त्यावेळी तो लढा यशस्वी झाला. त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि त्यानंतरच आपल्याला ईएसबीसी आरक्षण मिळाले.’

‘मराठा समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व समनव्यक, सहकारी आणि ज्यांनी पुढाकार घेतला, अन्नासाहेब पाटील यांचे चिरंजीव यांचे आभार मानतो. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते सर्व 18 पगड जातीचे होते. आज जाती विषमता कमी व्हायला हवी पण ती वाढतेय, मी सर्व समाजाचा आहे, पण आज मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे. का बाहेर फेकला गेला मराठा समाज?”, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला.

‘सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहे, त्या तुम्ही का करत नाही? आरक्षण हा समतेचा लढा आहे, आरक्षण आमच्या हक्काचे आहे ते आम्ही मिळवणारच. सारथी संस्था सुद्धा तुम्ही बुडीत घातली, अण्णासाहेब पाटील महामंडळाला काय दिले? फक्त राज्य सरकारने खेळ खंडोबा केला, किती खेळणार मराठा समाजासोबत ? मराठा आमदारांनी याची जबाबदारी घ्यायला हवी. ४२७ विद्यार्थी एमपीएससीमधून लागले, त्यातील १२७ मराठा आहेत, त्यांच्या नियुक्त्या रखडल्या, त्याला जबाबदार कोण?’, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*