रोह्यात चौदा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, तेव्हा ठाकरे – पवार सरकार झोपले होते का?

  • प्रवीण दरेकरांची टीका; महाराष्ट्रात अराजकता माजली आहे, त्यावर मुख्यमंत्री, राऊत बोलत नाहीत

विशेष प्रतिनिधी 

जालना : हाथरस प्रकरणावरून देशभरात संतापाचं वातावरण असताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. रोह्यात चौदा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तीला दरीत फेकून देण्यात आले तेव्हा ठाकरे – पवार सरकार झोपले होते काय? अशी विचारणा केली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते.

हाथरस घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला असून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्हीदेखील केली असल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशातील घटना दुर्दैवी असून चंद्रकांत पाटील यांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार असलं तरी आमची भूमिका स्पष्ट असून कोणीही घटनेची पाठराखण केलेली नाही आणि करणार नाही”. परिस्थिती हाताळण्यात योगी सरकार अपयशी ठरलेले नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.

दरेकर यांनी यावेळी ठाकरे – पवार सरकारवर निशाणा साधला. “रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पुण्यात एका तरुणीला डोंगरात नेऊन दगडाने ठेचून मारण्यात आले, त्यावेळी राज्य सरकार झोपले होते का?,” अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली. “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, संजय राऊत हे कोणीच बोलायला तयार नाहीत,” अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*