रेमडेसिवीर उपलब्धतेचा दावा खोटा, गरीबांचे हाल, लक्ष देण्याची देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चीनी व्हायरसच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात या इंजेक्शनची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चीनी व्हायरसच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात या इंजेक्शनची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यात दररोज सरासरी 20 हजार रुग्णांची भर पडत आहे. दररोज सरासरी साडेचारशेने मृतांची संख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने, त्याचा पुरवठा सुरळीत राहील आणि हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पण, अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचे कारण दिले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जाते. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे की, रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबवली होती. पण ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. यामुळे गरीबांचे सर्वाधिक हाल होत असल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.

धक्कादायक बाब म्हणजे अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकीकडे गरीब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी फडणवीस यांनी ठाकरे-पवार सरकारकडे केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*