राहुल गांधींना काही काम नाही, म्हणून ट्रॅक्टर रॅल्या काढताहेत; हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांची टीका

  • हरयाणात कोणालाही कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही; खट्टर यांनी दिला इशारा

वृत्तसंस्था 

चंडीगड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. हरयाणामध्येही अशीच रॅली आयोजित करण्यात आली असून, यावरून हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. दुसरीकडे या तिन्ही कायद्यांबद्दलचा शेतकऱ्यांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पंजाब, हरयाणासह देशातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहेत.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनै राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. हरयाणातही ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असून, त्यासंदर्भात हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना विचारण्यात आले. याला उत्तर देताना खट्टर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

“राहुल गांधी यांच्याकडे करण्यासारखे काही काम नाहीये. त्यामुळे ते असे काहीतरी करत आहेत आणि ठिक ठिकाणांना भेटी देत आहेत. त्यांच्या हरयाणातील भेटीविषयी आमच्याकडे काहीही माहिती आलेली नाही. काहीही झाले तरी आम्ही कोणालाही कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही,” असा इशाराही खट्टर यांनी दिला.

“तिन्ही कायदे कचऱ्याच्या डब्यात फेकू”

राहुल गांधी यांनी पंजाबमधील मोगा येथे काढण्यात आलेल्या रॅलीनंतर शेतकऱ्यांना संबोधित करताना सत्तेवर आल्यानंतर तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचं आश्वासन दिलं. “मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी काँग्रेस सत्तेत येईल, आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ,” असं राहुल गांधी म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*