पुरोगामी महाराष्ट्र शासन आता प्रतिगामी व्हायला लागलेय : आंबेडकर

  • केंद्राचे दिशानिर्देश राज्य सरकार मान्य करत नाही; आर्थिक केंद्रेही बेभरवशावर

वृत्तसंस्था

मुंबई : “महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखले जाते, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतेय. केंद्राने लॉकडाउन उठवण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देश महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. इतर राज्यांनी मंदिरे आणि आर्थिक केंद्रे सुरू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावले उचलत नाही. उलट ते बेभरवशावरच ठेवले आहे,” अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वटिद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ देखील जोडला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात की, “महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले आहे.

करोना लॉकडाउन उठवताना केंद्राने अनेक दिशानिर्देश दिले, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अ‍ॅप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. करोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजुनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे.”

तसेच, “इतर राज्यांमध्ये सुद्धा मी फिरतो आहे. इतर राज्यांनी मंदिरे उघडली. तिथला व्यवसाय व भक्तांसह दोघांचीही सांगड घातली. परंतु अजूनही महाराष्ट्र शासन मंदिरे उघडायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस इतर राज्यांनी आर्थिक घडामोडी सुरू केल्या आहेत. परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावले उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवले आहे, असे एकंदरीत दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगामीत्व व निर्णय घेणारे राज्य असे पुन्हा उभं करावे ही विनंती.” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*