पिंपरीकरांनी पाडलेल्या पार्थच्या पुनर्वसनासाठी अजितदादांचा पारनेरवर डोळा;रोहित पवारांच्या कर्जत पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न


मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव स्वीकारावा लागल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ राजकारणातून गायब झाले. मात्र, त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी अजित पवारांनी पारनेरवर डोळा ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पारनेरमधले शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडण्यामागे हाच उद्देश असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव स्वीकारावा लागल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राजकारणातून गायब झाले. मात्र, त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पारनेरमध्ये ‘कर्जत पॅटर्न’ राबविण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याचाच एक भाग म्हणून पारनेरमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडण्यात आले होते.

पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात आता जागा शिल्लक नाही. त्यामुळेच पवार कुटुंबियांनी नगर जिल्ह्याकडे आपला मोहरा वळविला आहे. शरद पवार यांचे एक नातू रोहित पवार नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत.

रोहित पवार यांना कर्जतमध्ये उभे राहण्यासाठी पवार कुटुंबियांनी प्रचंड साधनसामुग्रीचा वापर केला होता. या दुष्काळी तालुक्यात विद्या प्रतिष्ठान, बारामती अ‍ॅग्रो या संस्थांच्या माध्यमातून विकासाची स्वप्ने दाखविण्यात आली. निवडणुकीआधी वर्षभर कर्जत-जामखेडमधील महिला, शेतकऱ्यांच्या सहली बारामतीला आयोजित केल्या जात होत्या.

या भागातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून बारामतीतून मोठ्या प्रमाणावर टॅंकर पाठविण्यात आले होते. यामुळे रोहित पवार यांना निवडणुकीत यश मिळाले.

रोहित पवार यांना पहिल्याच प्रयत्नात आमदारकी मिळाली मात्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. अजितदादा पवार यांच्या ताब्यात असणारी महापालिका म्हणजे पिंपरी-चिंचवड असा लौकिक होता. मात्र मावळ मतदारसंघातील या महत्वाच्या महापालिका क्षेत्रातही पार्थ यांची पीछेहाट झाली. या ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून आले. आता शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केल्यानंतर येथील राजकीय गणिते पुन्हा बदलली आहेत. त्यामुळे पुढील काळात मावळ लोकसभा निवडणूक लढविणे सोपे राहिलेले नाही.

त्यामुळे विधानसभा मतदारसंघातूनच पार्थ यांची राजकीय कारकिर्द घडविण्याची अजित पवार यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बारामतीतून स्वत: अजित पवार लढत असल्याने पार्थ यांच्यासाठी दुसरा मतदारसंघाचा शोध चालू आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याला लागून असलेल्या पारनेर मतदारसंघावर त्यांची नजर गेली आहे. याठिकाणी शिवसेनेचे अनेक वर्षे आमदार असलेल्या विजय औटी यांचा यंदाच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी पराभव केला आहे. लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख होते. औटींसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला.

उद्धव ठाकरे हे २०१८ साली पारनेर दौऱ्यावर असताना लंके समर्थकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे पुढील निवडणुकीत शिवसेना ही जागा त्यांच्यासाठी सोडण्यास तयार होईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ही जागा पार्थ पवार यांना मिळू शकते, अशी राष्ट्रवादीची भावना आहे. त्यामुळेच पारनेरमध्ये पार्थ पवार यांनी नुकतीच भेट दिली होती. तेथेच त्यांनी नगरसेवकांची भेट घेतली. त्यांना थेट बारामतीला येण्याचे निमंत्रण देऊन पक्षांतर घडवून आणले. अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, उध्दव ठाकरे यांना ही गोष्ट फारच लागल्याने त्यांनी कडक भूमिका घेतली. त्यामुळे पार्थ पवार यांच्या पुनर्वसनाच्या पहिल्याच प्रयत्नाला पुन्हा एकदा खडा लागला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था